अलमट्टी, सर्किट बेंचसंदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक: मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:26 AM2019-09-17T10:26:11+5:302019-09-17T10:34:12+5:30
मुख्यमंत्र्यांनी ‘अलमट्टी व सर्किट बेंच’ या विषयावर गुरुवारी (दि. १९) मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.
कोल्हापूर : पूरपरिस्थितीस अलमट्टी धरणाचा विसर्ग कारणीभूत असल्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय जल आयोगाच्या पाणीसाठ्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन सोमवारी रात्री सर्वपक्षीय नागरी कृती समितीने व मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘अलमट्टी व सर्किट बेंच’ या विषयावर गुरुवारी (दि. १९) मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.
हॉटेल पंचशील येथे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महापौर माधवी गवंडी व निमंत्रक आर. के. पोवार व सहनिमंत्रक बाबा पार्टे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे, बाबा जगताप, किशोर घाटगे, प्रकाश रोडे-पाटील आदींचा समावेश होता.
सर्किट बेंचसंदर्भात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष अॅड. रणजित गावडे, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. जे. व्ही. पाटील, अॅड. गुरूप्रसाद माळकर, शिल्पा सुतार आदी उपस्थित होते.
विविध मान्यवरांनी घेतली फडणवीस यांची भेट
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मान्यवरांनी सोमवारी रात्री हॉटेल पंचशील येथे भेट घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुुरुजी, साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोेडे, विजय जाधव, राहुल देसाई, विजय आगरवाल, आदी उपस्थित होते.