टोेलबाबत आज मुंबईत बैठक
By admin | Published: January 28, 2015 12:50 AM2015-01-28T00:50:11+5:302015-01-28T00:59:14+5:30
समितीमधून आमदारांना वगळले : मात्र बैठकीसाठी निमंत्रण
कोल्हापूर : शहरातील टोलप्रश्नावर पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या मूल्यांकन समितीची उद्या, बुधवारी मुंबईत समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात दुपारी दोन वाजता पहिली बैठक होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने समिती स्थापनचा अध्यादेश जारी केला आहे. समिती सदस्यांंमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व अमल महाडिक यांच्यासह महापौर तृप्ती माळवी यांचा समावेश नाही. मात्र, त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपसचिव संजय सोळंकी यांनी २२ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशानुसार आठ जणांची समितीची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीमध्ये सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट, सार्वजानिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव श्री. नाईक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरविकास सचिव (क्र.२) तसेच समिचे सचिव म्हणून नगरविकासचे उपसचिव ज. ना. पाटील यांची नेमणूक केली आहे.
कृती समितीने असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअरिंग असोसिएशनच्या दोन सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्याची विनंती केली आहे. आर्किटेक्ट संदीप घाटगे व राजेंद्र सावंत यांची नावे सुचविली आहेत.