सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसोबत पुढील आठवड्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 04:51 PM2019-05-07T16:51:03+5:302019-05-07T16:54:27+5:30
टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापूर : टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करून आंदोलकांवरील गुन्हे काढून टाकण्याचे निर्देश तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले होते; परंतु अद्यापही अनेक गुन्हे न्यायालयात प्रलंबित असून त्यासाठी नेमलेल्या तारखांना आंदोलकांना फेºया माराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली.
टोल रद्द करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा व पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, याबाबत निवेदन दिले. त्यावर पालकमंत्र्यांनी सर्व गुन्हे काढून टाकण्याची जबाबदारी स्वत: घेतली आहे. तसेच त्यांनी केलेल्या सूचनेनुसार याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना द्यावे. तसेच गुन्ह्यांबाबतची संपूर्ण माहिती संकलित करून तिचा अहवाल पालकमंत्र्यांमार्फत शासनाला सुपूर्द करता येईल, अशी व्यवस्था करावी, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यानुसार कृती समितीतर्फे निवेदन देण्यात येत आहे.
शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली टोलविरोधी आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करावी असे सांगितले. तसेच पुढील आठवड्यात या संदर्भात पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन अहवाल तयार करून तो पालकमंत्र्यांमार्फत शासनाला पाठविला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याची प्रत कृती समितीलाही दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, किसन कल्याणकर, अॅड. पंडितराव सडोलीकर, जयसिंग शिंदे, गौरव लांडगे, स्वप्निल पार्टे, दिलीप माने, महादेव पाटील, विवेक कोरडे, सुनील खिरूगडे, संदीप कांबळे, आदी उपस्थित होते.