धनगरवाड्यांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:39+5:302020-12-09T04:18:39+5:30
कोल्हापूर : धनगरवाड्यावरील पायाभूत सोयीसुविधांच्या प्रश्नांवर लवकरच संबंधित विभागातील सर्व अधिकारी आणि समाजसंघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ...
कोल्हापूर : धनगरवाड्यावरील पायाभूत सोयीसुविधांच्या प्रश्नांवर लवकरच संबंधित विभागातील सर्व अधिकारी आणि समाजसंघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली. धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचे संयोजक संदीप कारंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इचलकरंजी येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन धनगरवाड्याची परिस्थिती बिकट असल्याने लक्ष घालण्याची विनंती केली. यावर पाटील यांनीही लगेच होकार दर्शवत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.
केवळ रस्ता नसल्याने वेळेत उपचार करता आले नाहीत म्हणून दोन जिवांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर धनगरवाड्यांच्या प्रश्नावर गोलमेज परिषदेने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन गोलमेज परिषदेने मागण्यांचे निवेदन दिले.
रस्ते, वीज, पाण्यासह पायाभूत सुविधांपासून वर्षानुवर्षे दूर असणारे धनगरवाडे आणि त्यांचे प्रश्न यावर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या या बैठकीकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने गोलमेज परिषदेने त्यांचे आभार मानले असून, प्रश्नांची प्रभावी मांडणी करणार असल्याचे कारंडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे, अमोल गावडे, अमोल मेटकर अनिल बनकर, संदीप हजारे, कागल तालुकाध्यक्ष सुनील शेळके, राधानगरी तालुकाध्यक्ष संदीप झोरे, अजित फोंडे, दत्ता ठोंबरे, दीपक ठोंबरे, प्रा. घुरके यांंचा समावेश होता.