‘केशवराव भोसले’संदर्भात लवकरच पुण्यात बैठक
By admin | Published: May 20, 2017 04:49 PM2017-05-20T16:49:24+5:302017-05-20T16:49:24+5:30
: विभागीय आयुक्तांकडून नुतनीकरणासंदर्भात पाहणी , विभागीय आयुक्तांच्या प्रश्नाने सर्वजण अनुत्तरीत
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : स्थळ केशवराव भोसले नाट्यगृह...सकाळी सव्वा दहाची वेळ...मी इथे का आलो आहे...या विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या प्रश्नावर उपस्थित कोणालाही उत्तर देता आले नाही. केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण आराखड्याच्या सादरीकरणावेळी त्यांनी काही शंकांचे योग्य निरसनही झाले नाही. यावेळी त्यांनी आराखड्यासंदर्भात लवकरच पुण्यात बैठक घेऊ, यामध्ये या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करा, असा सुचना संबंधितांना दिल्या.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाच्या पाहणीवेळी त्यांनी या सुचना दिल्या. यावेळी आराखड्यातील नुतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे व दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित कामांची माहिती आर्किटेक्ट अंजली जाधव यांनी चित्रफितीद्वारे द्यायला सुरुवात केली. सादरीकरणावेळी वारंवार येणाऱ्या तांत्रिक व्यत्ययाबद्दल त्यांनी विचारणा करुन काहीशी नाराजी व्यक्त केली.
सादरीकरणावेळी पहिल्या टप्प्यातील झालेल्या कामाबद्दल माहिती दिली. यामधील लेंडस्केप पेंटींग, स्टेच्यू आर्केड, कॅँटीन, संरक्षक भिंत, खासबाग आर्चिस, तिकीट बुकींग खोली ही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये ब्लॅक बॉक्स (मिनि थिएटर)यामध्ये प्रायोगिक रंगभूमी, टीव्ही मालिकांचे शुटींग व २०० ते २५० लोकांची बसण्याची आसन क्षमता असेल, त्याचबरोबर पर्यटकांनी आवर्जुन भेट द्यावी अशा पध्दतीने प्रस्तावित खाऊ गल्ली अशा स्वरुपाच्या कामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
यावर चंद्रकांत दळवी यांनी ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून एवढी मोठी गुंतवणूक करुन सुविधा निर्माण केल्यास त्याचा कितपत फायदा होऊ शकतो व या संदर्भात कोल्हापूरातून अशी मागणी आहे का? अशी विचारणा केली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी मंजूर झाला का अशी विचारणाही संबंधितांना त्यांनी केली. यावर महापालिका अधिकाऱ्यांकडून दीड वर्षे या संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. यावर आराखड्यासंदर्भात लवकरच पुण्यात बैठक घेऊन यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाचे सविस्तर सादरीकरण करावे, निधीसंदर्भात यावेळी निर्णय घेऊ असेही चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.