‘महासंग्राम’मध्ये फिक्सिंगचा आरोप शिवाजी पेठेत बैठक : पाच संघांची स्वतंत्र असोसिएशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:01 AM2018-06-14T01:01:50+5:302018-06-14T01:01:50+5:30
शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी (दि. १६) होणारा अंतिम सामना ‘फिक्सिंग’ असल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांत सुरू असल्याचा आरोप शिवाजी मंदिरात बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण
कोल्हापूर : शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी (दि. १६) होणारा अंतिम सामना ‘फिक्सिंग’ असल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांत सुरू असल्याचा आरोप शिवाजी मंदिरात बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, साईनाथ स्पोर्टस, संध्यामठ तरुण मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत ‘शिवाजी पेठ फुटबॉल असोसिएशन’ स्थापण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीची माहिती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व उपाध्यक्ष अजित राऊत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या २८ मेपासून सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. ८) शेवटचा सुपर लीगचा सामना ‘पाटाकडील’ व ‘बालगोपाल तालीम मंडळ’ यांच्यात झाला. तो ४० मिनिटे घ्यावयाचा असताना त्याचा पूर्वार्ध ३० मिनिटे व उत्तरार्ध २५ मिनिटांचा का झाला? या निर्णयावर के.एस.ए. व रेफ्री असोसिएशनने कोणती कारवाई केली..? त्यामुळे अशा गैरप्रकारांस आळा घालण्यासाठी सर्वांच्या मते ‘शिवाजी पेठ फुटबॉल असोसिएशन, ही संस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शनिवारी होणारा अंतिम सामना ‘फिक्स’ केल्याची चर्चा असून त्यात पीटीएम एक नंबर, तर बालगोपाल दोन नंबर अशी चर्चा असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित ऊर्फ पिंटू राऊत, सचिव महेश जाधव, सहसचिव सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, श्रीकांत भोसले, विशाल भोगम, अमित इंगळे, अतुल भालकर, शरद नागवेकर, संध्यामठ तरुण मंडळाचे पप्पू नलवडे, संदीप भोसले, ‘खंडोबा’चे जोतिराम जाधव, अरुण दळवी, दिलीप सूर्यवंशी, सोनू चौगुले, मनोज बालिंगकर, अमित इंगळे, फुलेवाडी क्रीडा मंडळाचे नगरसेवक राहुल माने, युवराज पाटील, प्रा. अभिजित वणिरे, साईनाथ फुटबॉल संघाचे गौरव माने, धीरज चौगले, माजी फुटबॉलपटू बाबूराव घाटगे, राजू भोईटे, जयवंत अतिग्रे उपस्थित होते.
‘चंद्रकांत महासंग्राम’साठी शनिवारी अंतिम लढत
कोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची फुटबॉल स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेतील पाटाकडील तालीम मंडळ (अ) व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार शनिवारी (दि. १६) दुपारी चार वाजता फुटबॉल रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर २७ मे पासून ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या अंतिम सामना रविवारी (दि. १०) जूनला होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने आता हा सामना शनिवारी दुपारी होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ५ लाख ११ हजार, तर उपविजेत्या संघास ३ लाख ११ हजार व ‘मालिकावीरा’स बुलेट, चाहत्यांमधून दोन लकी कुपनद्वारे पुरुष प्रेक्षकांना मोटारसायकल, तर महिला प्रेक्षकांना दुचाकी संयोजकांच्यावतीने भेट दिली जाणार आहे.