उपोषणाबाबत आज बैठक
By admin | Published: April 7, 2017 01:03 AM2017-04-07T01:03:10+5:302017-04-07T01:03:10+5:30
सर्किट बेंच आंदोलन : कृती समिती करणार चर्चा; आंदोलन स्थगित शक्य
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समिती आणि सर्वपक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीने आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता संयुक्त बैठक आयोजित केली आहे. न्यायसंकुलातील शाहू सभागृहात होणाऱ्या बैठकीत समिती ही सभासदांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी गुरुवारी दिली. गुरुवारच्या साखळी उपोषणाची सांगता असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते करण्यात आली.
कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी येथील वकिलांचे सन २०१० पासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून दि. १ डिसेंबर २०१६ पासून न्यायसंकुलासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बुधवारी विधानभवनामध्ये कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना एक आठवड्यात भेटून किंवा पत्र देऊन विनंती केली जाईल, अशी ग्वाही दिली. शिवाय त्यांनी साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन खंडपीठ कृती समितीला केले. या आवाहनानुसार उपोषणाबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येईल, असे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. दरम्यान, साखळी उपोषणाच्या १२७ व्या दिवशी गुरुवारी कोल्हापुरातील वकिलांचे लेखनिक (क्लार्क) या आंदोलनात सहभागी झाले. त्यांचे उपोषण माजी अध्यक्ष घाटगे यांच्या हस्ते सरबत देऊन सोडण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष अशोक पाटील, विजय पाटील, के. के. सासवडे, कल्पना पाटील, मेघा पाटील, धैर्यशील पवार, आदी उपस्थित होते. आंदोलनात नथुराम साळवी, अनिल सावंत, कृष्णात कदम, किशोर साळोखे, चंद्रकांत पाटील, प्रताप पाटील,
रमेश बागणे, निवास निकम, प्रशांत कांबळे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयात पाठपुरावा : मोरे
मुंबईत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पुढील कार्यवाहीसाठी गुरुवारी मंत्रालय आणि विधि व न्याय विभागात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पाठपुरावा केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, साखळी उपोषणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज, शुक्रवारी कृती समितीची बैठक होणार आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद उपस्थित राहतील. बैठकीमध्ये मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारला ठरावीक कालावधी देणे आणि गेल्या १२७ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण हे स्थगित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.