Maratha Reservation: कोल्हापुरात उद्या बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
By संदीप आडनाईक | Published: December 23, 2023 05:41 PM2023-12-23T17:41:27+5:302023-12-23T17:42:56+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनात शासनाला दिलेली २४ तारखेची मुदत संपत आल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटलांनी २० ...
कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनात शासनाला दिलेली २४ तारखेची मुदत संपत आल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटलांनी २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपाेषण करण्याची भूमिका जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, दसरा चौकातील आंदोलन मंडपात सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाने व्यापक बैठक बोलावली आहे. दरम्यान, शनिवारी कोल्हापुर शहर रूग्णवाहिका सेवा संस्थेने रुग्णवाहिकांसह आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला.
कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाने गेली ५४ दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु ठेवले. जरांगे पाटील यांच्या पुढील आदेशापर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शासनाला दिलेली मुदत संपल्याने साखळी धरणे आंदोलन रविवारपासून बंद करण्यात येणार असून यापुढील लढाई आता प्रत्यक्ष रस्त्यावर करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांचे आदेश आल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे कोल्हपुरातील समन्वयकांनी ठरवले आहे. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे.
दसरा चौकात शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदुलकर, प्रा. अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शशिकांत पाटील, शैलजा भोसले यांनी सकल मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, या आंदोलनाची व्यापकता वाढविण्यासाठी मराठा समाजातील सदस्यांनी, त्यांच्या लेकरे-बाळांच्या भवितव्याचा विचार करुन, तसेच संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.
रुग्णवाहिका दसरा चौकात
कोल्हापुरातील धरणे आंदोलनस्थळाला शनिवारी कोल्हापूर शहर रूग्णवाहिका सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अनेक रुग्णवाहिकांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घातल्या. संस्थेचे गणेश पाटील, अजित ढवण, नौशाद बारगीर, प्रशांत पाटील, अनिल घोरपडे, रवि कांबळे, सुंदर कणसे, वसिम तहसिलदार, केदार आंमले, सागर शिंदे, महेंद्र माने, निरंजन दुर्गळे, सुरज नाईक, शिवाजी रावळ, चंदू चौगुले, फिरोज सय्यद, अनिल कांबळे, कमला परिट यांनी संस्थेचे सेक्रेटरी रवि घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी झाले.