पोलीस अधीक्षक कार्यालयात आज व्यापाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:17+5:302021-06-28T04:18:17+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला, तर आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी सर्वच दुकाने ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला, तर आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी सर्वच दुकाने उघडणार असल्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील सर्वच व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. सकाळी १०.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक होत आहे.
गेले अडीच महिने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे सर्वच उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी मेटाकुटीला आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आक्रमक झालेले उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली आज, सोमवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. पण शासनाचे निर्बंध पाळणे बंधनकारक आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी संयमाची भूमिका घेऊन सहकार्य करावे, त्यासाठी आज, सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह सर्वच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी बोलावली आहे.