केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवाजी पूलप्रश्नी आज चर्चा
By Admin | Published: March 14, 2017 11:57 PM2017-03-14T23:57:42+5:302017-03-14T23:57:42+5:30
अन्यथा जुन्या शिवाजी पुलावर विटांचे बांधकाम करून तो वाहतुकीसाठी कायमचा बंद करण्याचा इशारा
कोल्हापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची फाईल आता मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवली आहे. आज, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर सखोल चर्चा होऊन ती अंतिम मंजुरीसाठी संसदेकडे पाठविण्यात येणार आहे.रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम दहा दिवसांत सुरू करून ते मे महिन्याअखेर पूर्ण करावे; अन्यथा जुन्या शिवाजी पुलावर विटांचे बांधकाम करून तो वाहतुकीसाठी कायमचा बंद करण्याचा इशारा देत सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने ३ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यामुळे या पर्यायी पुलाच्या कागदपत्रांची फाईल आता गतीने हलली आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे हे दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. पुरातत्त्व खात्याने काही नियमांत सुधारणा करून आवश्यक त्या कागदपत्रांसह शिवाजी पुलाबाबतची फाईल मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवली आहे. त्यावर आज, बुधवारी चर्चा करण्यात येऊन मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी ती संसदेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता पर्यायी शिवाजी पुलाच्या कागदपत्रांची फाईल मंजुरीसाठी गती आली
आहे.
पर्यायी शिवाजी पुलासंदर्भातील विषय आज, बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी ठेवला आहे. त्यानंतर संसदेतील अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात केली जाईल. या संदर्भात आपण स्वत: दिल्लीत थांबून पाठपुरावा करीत आहोत.
- आर. के. बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग