ऊसतोडणी दराबाबत बुधवारी होणार बैठक
By admin | Published: November 17, 2014 12:29 AM2014-11-17T00:29:28+5:302014-11-17T00:36:52+5:30
सकारात्मक चर्चा झाली तर ठीक, अन्यथा कोयता बंद
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक दराबाबत राज्य शासन व ऊस तोडणी-वाहतूक संघटना यांच्यात बुधवारी (दि. १९) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत तोडणी व वाहतूक दरासह इतर मागण्यांबाबत चर्चा होणार असून, सकारात्मक चर्चा झाली, तर ठीक अन्यथा २५ नोव्हेंबरपासून ‘कोयता बंद’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे.
ऊस तोडणी व वाहतूक दराबाबत तीन वर्षांपूर्वी करार झालेला आहे. त्याची मुदत संपल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ऊसतोडणी व वाहतूक संघटनेच्यावतीने शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते. आघाडी सरकारने यासंबंधी दोन बैठका घेऊन चर्चा सुरू केली होती; पण तोपर्यंत राज्यात सरकार बदलल्याने पुन्हा हा प्रश्न भिजत राहिला आहे. नवीन सरकार आल्यानंतर ऊसतोडणी व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली.
सरकारवरील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने देण्यात आले. २४ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही, तर २५ नोव्हेंबरपासून कोेयता बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये ऊसतोडणी व वाहतूक दर, ऊसतोडणी मजुरांचे कल्याणकारी मंडळ, अपघात विमा, आदी प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
सरकारने बुधवारी यासंबंधी बैठक बोलविल्याचे समजते. यामध्ये सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा आहे. मागण्या मान्य नाही झाल्या, तर नाईलास्तव पुन्हा आंदोलन करावे लागेल.
- डॉ. सुभाष जाधव (सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी व वाहतूक संघटना)