पीएचडी फेलोशिपबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपोषणकर्त्यांना ग्वाही
By समीर देशपांडे | Published: November 13, 2023 05:51 PM2023-11-13T17:51:29+5:302023-11-13T17:51:44+5:30
गेली १५ दिवस विद्यार्थ्यांचे उपोषण
कोल्हापूर: सरसकट सर्वांना पीएचडीसाठीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी ‘साारथी’च्या येथील उपकेंद्रासमोर उपोषणाला बसलेल्या युवकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून त्यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर लवकरच बैठक घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली असून या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
गेले १५ दिवस हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. ‘सारथी’तर्फे पीएचडीसाठीच्या विद्यार्थ्यांना महिना ३६ हजार रूपये फेलोशिप देण्यात येणार आहे. परंतू ही फक्त पहिल्या टप्प्यात २०० विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. मात्र यासाठी १३१२ विद्यार्थी पात्र आहेत. सर्वांनाच सरसकट फेलोशिप मिळावी अशी या सर्वांची मागणी आहे. सोमवारी या विद्यार्थ्यांनी पाटील यांची भेट घेतली. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.