कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:56 AM2021-02-01T10:56:58+5:302021-02-01T10:59:03+5:30
Airport Kolhapur- कोल्हापूर येथील कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.
कोल्हापूर : येथील कोल्हापूरविमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.
कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.
या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यावर पुढे नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला.
आता या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. औरंगाबाद येथील खासदार डॉ. भागवत कराड यांनी नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. त्यावर शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती मंत्री पुरी यांनी दिली. मंत्रिमंडळाची बैठक महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या नामकरणासाठी गेल्या २२ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. नामकरणाची अंमलबजावणी सरकारकडून लवकर व्हावी.
- ललित गांधी,
अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन