मेघोली घटनास्थळी अनेक नेत्यांच्या भेटी, नुकसान झालेल्या गावांत पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:33+5:302021-09-04T04:30:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव गळतीमुळे फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी,
मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव गळतीमुळे फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी प्रशासनाने सुरुवात केली आहे. घटनास्थळी अनेक नेतेमंडळी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा देत आहेत.
बुधवार, दि. १ सप्टेंबरच्या रात्री ९८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला मेघोली तलाव गळतीमुळे फुटला. तलाव पायातून फुटल्याने पाण्याचा लोंढा मोठा आणि वेगवान होता. या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील माती आणि पिके धुऊन गेली आहेत. हजारो वृक्ष, विजेचे खांब, रोहित्र, छोटे बंधारे, रस्ता, पूल, विजेच्या मोटारी उखडून गेल्या आहेत. यामध्ये एक महिला आणि पाच जनावरे मयत झालीत, तर सात जनावरे बेपत्ता झाली होती. बेपत्ता जनावरांची शोधमोहीम सुरू आहे. जमिनीचे बांध आणि मोजणीच्या खुणा नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या हद्दी कायम करून देणे हे महसूल आणि मोजणी खात्याला आव्हान देणारे आहे. जमिनीवर कोणत्याही खुणा शिल्लक नाहीत.
झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अशी पंचवीस अधिकाऱ्यांची टीम कार्यरत झाली आहे. याशिवाय पाटबंधारे विभाग, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांचे इंजिनिअर त्यांच्या नुकसानीचा पंचनामे करीत आहेत.
तलाव फुटल्यामुळे वेदगंगा नदीची पाण्याची पातळी ५ फुटांनी वाढून पाण्याचा रंग लाल होऊन मातीमिश्रित पाणी झाले. हा प्रकल्प फुटल्याने कडगावपासून ते वेदगंगा नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सर्व ग्रामपंचायतींनी बंद केला आहे. लोकांच्या आरोग्यासाठी हा उपाय करण्यात आला असल्याचे सरपंचांनी सांगितले आहे. लोकांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच मोठा महापूर येऊन पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना ताज्या असतानाच ही घटना घडल्याने नदीकाठच्या गावांना धडकी भरली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार एमएसईबीचे विद्युत खांब, रोहित्र असे एकूण २९ लाख ३५ हजार रुपयांचे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमार्ग आणि प्रजिमाचे ५६ लाख ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शुक्रवारी मेघोली येथे खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली .त्यानंतर मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर या गावांतील शेतकऱ्यांची वेंगरुळ येथे बैठक घेतली. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली. शनिवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक हे भेट देणार आहेत.
फोटो :
म्हसवे : मेघोली प्रकल्प फुटल्याने वेदगंगा नदीचे स्वच्छ पाणी गढूळ झाले. फोटो मेलवर पाठवला आहे.