ऊसदराबाबत साखर संघात गुरुवारी बैठक
By admin | Published: November 14, 2015 01:01 AM2015-11-14T01:01:52+5:302015-11-14T01:15:22+5:30
चंद्रकांत पाटील : ‘एफआरपी’चा तिढा सुटणार
कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’वरून राज्यात साखर उद्योगासमोर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी गुरुवारी (दि. १९) साखर संघात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपीवरून पेच निर्माण झाला आहे. साखरेचे बाजारातील दर व बॅँकांची उचल पाहता एकरकमी पैसे देणे अशक्य असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद घेऊन आंदोलनाचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता; पण ऊस परिषदेच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून अधिक आक्रमक न होता, पहिल्यांदा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करावी असे सूचविले व त्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना त्यांनी सहकार विभागाला दिली होती. त्यानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघात चंद्रकांतदादा पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे. साखर कारखानदार, संघटनांचे प्रतिनिधी, उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघाच्या कार्यालयात बैठक होत आहे. यामध्ये सर्व घटकांशी चर्चा करून चांगला निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहील व एकरकमी एफआरपीवर ठाम आहे.
- चंद्रकांतदादा पाटील (सहकारमंत्री)