मेघा पानसरे, हमीद दाभोलकर ‘नेक्स्ट टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:11 AM2018-08-17T01:11:54+5:302018-08-17T01:11:58+5:30
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये मेघा पानसरे, हमीद व मुक्ता दाभोलकर यांचा ‘नेक्स्ट टार्गेट’ असा उल्लेख आढळल्याने या तिघांनाही स्टेट इंटिलिजन्स विभागाने (एसआयडी) ‘एक्स’ दर्जाचे संरक्षण पुरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत २४ तास स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) विभागाचा जवान तैनात करण्यात आला आहे. हे तिघे भारतात कुठेही गेले तर त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी त्यास दुजोरा दिला आहे.
मेघा ह्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्नुषा आहेत. तर हमीद व मुक्ता दाभोलकर हे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुले आहेत. दाभोलकर व पानसरे यांचे ते लोकांच्या मनांतील धर्माविषयीच्या भोंदू कल्पनांबाबत जागरुकता करीत असल्याच्या रागातून उजव्या विचारांच्या एका गटाने अत्यंत नियोजनबद्धपणे मॉर्निंग वॉकला गेल्यावर पिस्तुलाने निर्घून खून केले आहेत. याच लोकांनी कर्नाटकातील विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचाही खून केल्याचा संशय आहे. तपासादरम्यान कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे काही डायऱ्या व साहित्य सापडले. त्यामध्ये पानसरे व दाभोलकर बहीण-भावांबद्दल उल्लेख आढळला. त्यानुसार ही माहिती कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाला सुमारे दोन महिन्यांपूर्वी कळविली. महाराष्ट्र शासनाकडून त्याची वेगवेगळ्या पातळीवर कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळल्याने सुरुवातीला राज्य पोलीस दलाचे संरक्षण पुरविण्यात आले. त्यानुसार पानसरे यांच्या निवासस्थानी सहा पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता; परंतु कांही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांचे संरक्षण काढून घेण्यात आले. पुण्यातून ‘एसआयडी’ विभागाचे प्रमुख कृष्णप्रकाश यांचा मेघा पानसरे यांना फोन आला व त्यांनी काळजी घ्यायची गरज असल्याने एसपीयू विभागाचा जवान संरक्षणासाठी तैनात करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार या विभागाचे जवान या तिघांनाही सध्या संरक्षण देत आहेत.
कारण काय?
पानसरे व दाभोलकर यांच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या तिघांनीच लावून धरला आहे. त्याशिवाय जिथे सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध होईल तिथे हे त्यांच्या विचारांबद्दल, तपासातील दिरंगाईबद्दल वारंवार सरकारचे लक्ष वेधत आहेत. त्यातूनही काही लोक दुखावले गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.