गळतीनंतरच मेघोली धरण फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:49+5:302021-09-03T04:23:49+5:30

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली पाटबंधारे प्रकल्प (धरण) फुटण्याआधी जॅकवेल जवळ मोठ्या प्रमाणात गळीत सुरू झाली होती, त्यानंतर ...

Megholi dam burst only after the leak | गळतीनंतरच मेघोली धरण फुटले

गळतीनंतरच मेघोली धरण फुटले

googlenewsNext

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली पाटबंधारे प्रकल्प (धरण) फुटण्याआधी जॅकवेल जवळ मोठ्या प्रमाणात गळीत सुरू झाली होती, त्यानंतर धरणाच्या मुख्य भिंतीमधील १०० मीटरचा भरावा वाहून गेला आणि धरण फुटले. केवळ तीन तासात २.५४ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेल्याने लाभक्षेत्रातील पाच गावातील शेती बाधित झाली. एका महिलेस जनावरे वाहून गेली, असा प्राथमिक अहवाल पाटबंधारे प्रशासनाने तयार केला आहे.

धरण फुटीची चौकशी करून सरकारने जिल्हा पाटबंधारे प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. प्राथमिक अहवाल गेल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीकडून धरण फुटीची चौकशी होणार आहे. प्राथमिक अहवालानुसार बुधवारी रात्री १० वाजता मोठा आवाज झाला. काही वेळातच धरण फुटले. त्यानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी गतीने वाहत गेल्याने काठावरील घरातील महिला आणि जनावरे वाहून गेली. धरणाच्या खालील बाजूची नवले, ममदापूर, वेंगरूळ, सोनुर्ली, तळकरवाडी या गावची जमीन वाहून गेली आहे. वाहून गेलेले पाणी पुढे वेदगंगा नदीत गेले. परिणामी एका रात्रीत नदीची पाणी पातळी १ ते दीड मीटरने वाढली व नंतर कमी झाली.

चौकट

२० वर्षानंतर फुटले

मेघोली धरणास १९९५-९६ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर २००० मध्ये धरण पूर्ण झाले. याच्या कामावर त्यावेळी ८ कोटी ४७ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. कर्नाटकातील विजापूर येथील ठेकेदाराने हे काम केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर २० वर्षानंतर धरण फुटल्याने पाटबंधारे प्रशासनही गोंधळात सापडले आहेे. धरणाचे काम निकृष्ट झाल्याने फुटले का, हे कारण असते तर २० वर्षात का फुटले नाही, या जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस होता, त्यावेळी का धरणाला धोका निर्माण झाला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पाटबंधारे प्रशासनाकडे नाहीत.

चौकट

धरणामुळे सुबत्ता आलेले उद्ध्वस्त

धरण झाल्यामुळे कोरडवाहू जमीन बागायत झाली. काही प्रमाणात का असेना आर्थिक सुबत्ता आली. पण धरण फुटल्याने धरणाच्या पाण्याने बागायत झालेली जमीन वाहून गेली. प्रचंड नुकसान झाले. ज्या धरणाच्या पाण्याने सुबत्ता आली होती, तेच धरण फुटल्याने नुकसानग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

धरणाची ठळक माहिती

- मेघोलीतील स्थानिक ओढ्यावरील धरण

- मातीचे धरण

- धरणाचे एकूण बुडीत क्षेत्र ३३.७४ हेक्टर

- जिल्ह्यात एकूण ३१ लघु पाटबंधारे प्रकल्पापैकी एक मेघोली धरण

- धरणाच्या भिंतीच्या माथा रूंदी ९ मीटर

- धरणाची लांबी ४९५ मीटर तर उंची ३२.३० मीटर

- धरणाच्या खाली ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे

कोट

धरण नेमक्या कोणत्या कारणांनी फुटले हे आताच सांगता येणार नाही. पावसाळ्यापूर्वी नेहमीप्रमाणे धरणाची तपासणी केली होती. वर्षापूर्वी धरण सुरक्षा समितीनेही धरणाची पाहणी केली होती. यामध्ये धरणास धोका असल्याचे निदर्शनास आले नाही.

स्मिता माने,

कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग

Web Title: Megholi dam burst only after the leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.