मेघोली तलाव फुटला, शेतकरी उद्ध्वस्त -एका महिलेचा वाहून गेल्याने मृत्यू, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:00+5:302021-09-03T04:25:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी /शिवाजी सावंत मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री ...

Megholi lake bursts, farmers devastated - a woman dies after being carried away, major damage to agriculture in the area | मेघोली तलाव फुटला, शेतकरी उद्ध्वस्त -एका महिलेचा वाहून गेल्याने मृत्यू, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

मेघोली तलाव फुटला, शेतकरी उद्ध्वस्त -एका महिलेचा वाहून गेल्याने मृत्यू, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी /शिवाजी सावंत

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री फुटल्याने परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. रात्री धरण फुटल्यानंतर पाण्यातून एक महिला आणि अकरा जनावरे बुडाली. पाण्याचा प्रवाह वेगवान आणि मोठ्या प्रमाणात असल्याने ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके आणि माती वाहून गेली आहेत. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांचे मोठं नुकसान झाले आहे.

सन १९९६ साली हे मातीचे धरण बांधण्यास सुरुवात झाली. तर २००० च्या दरम्यान या धरणात ९८ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाणी साठवण्यात येऊ लागले. या धरणच्या बांधकामासाठी ४ कोटी ७० लाख रुपये खर्च आलेला आहे. धरणाच्या आऊटलेट जवळ पायथ्यालाच या धरणाच्या भिंतीतून सुरुवातीपासून गळती लागलेली होती. याबाबत अनेकवेळा शेतकऱ्यांनी तर गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या धरणावर असलेल्या रक्षकाची बदली अन्य ठिकाणी केल्याने रात्री धरण फुटल्याचे स्थानिक लोकांच्याकडून प्रशासनाला समजले.

बुधवारी रात्री धरण फुटल्याचे समजताच लोकांनी धरणस्थळाकडे धाव घेतली. अंधारात बॅटरीच्या उजेडात लोकांना पाण्याचा प्रवाह पाहून काळजात धस्स झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. जवळच्या गावांना सतर्क राहण्यासाठी फोन केले जाऊ लागले.

या पाण्यातून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय ५५) या महिला वाहून गेल्या. ही महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्व जण वाहून गेले; परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर आले. परंतु आपली आई वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले. त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे कोसळली, मोटारसायकली वाहून गेल्या, विजेचे खांब उखडून गेले आहेत. तलावापासून शेळोलीपर्यंतच्या शेकडो एकरांवरील पिके वाया गेली आहेत. जमिनीला बांध शिल्लक राहिले नाहीत. सगळीकडे दगडगोटे पसरले आहेत. प्रशासनातील सर्व अधिकार, पदाधिकारी रात्री रात्रभर घटनास्थळी बसून होते.

Web Title: Megholi lake bursts, farmers devastated - a woman dies after being carried away, major damage to agriculture in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.