सभासद शेतकरी हेच ‘शाहू’च्या यशाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:08+5:302021-02-13T04:24:08+5:30
ऊस पीक परिसंवाद कागल : शाहू साखर कारखाना संपूर्ण देशात नावजलेला साखर कारखाना असून रोज यशाची नवनवीन शिखरे ...
ऊस पीक परिसंवाद
कागल : शाहू साखर कारखाना संपूर्ण देशात नावजलेला साखर कारखाना असून रोज यशाची नवनवीन शिखरे पार करत आहे. या यशाचे सभासद शेतकरी हेच मानकरी आहेत, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे समरजित घाटगे यांनी केले. नंदगाव व इस्पुर्ली सेंटरकडील सभासदांच्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. चौदा गावांतील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने या परिसंवादास उपस्थित होते.
यावेळी शाहू कारखान्यास ऊस विकाससाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल समरजित घाटगे व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे यांचा सभासदांनी सत्कार केला. घाटगे पुढे म्हणाले, स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे कल्याण व भागाचा कायापालट केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर हीच परंपरा मी पुढे चालवत आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जाराज्यमंत्री वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :
योग्य वेळी, योग्य काम, योग्य पद्धतीने करा :
ऊस पीक लागवडीमध्ये पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शाहू साखर कारखाना आधुनिक तंत्रज्ञान सभासदांच्या बांधावर पोहोचविण्यात अग्रेसर आहे. त्याचा लाभ घ्या. ऊसशेतीत योग्यवेळी योग्य काम, योग्य पद्धतीने केल्यास पूर्वहंगामी व खोडवा उसाचे किफायतशीर उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला व्ही. एस. आयचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. बी. माने-पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.
छायाचित्र : १२ शाहू कारखाना परिसंवाद.
कागल येथे शाहू कारखान्याच्या नंदगाव व इस्पुर्ली सेंटरकडील सभासदांसाठीच्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना चेअरमन समरजित घाटगे.