सभापती विरुद्ध सदस्य रणकंंदनजिल्हा परिषद सभा : स्वनिधीवरून संघर्ष उफाळला;

By admin | Published: March 25, 2016 12:50 AM2016-03-25T00:50:18+5:302016-03-25T00:50:39+5:30

सर्व पंचायत समितीच्या सभापतींचा सभात्याग

Members against the Speaker of the Rakankandhan District Council meeting: Conflicts broke out on funding; | सभापती विरुद्ध सदस्य रणकंंदनजिल्हा परिषद सभा : स्वनिधीवरून संघर्ष उफाळला;

सभापती विरुद्ध सदस्य रणकंंदनजिल्हा परिषद सभा : स्वनिधीवरून संघर्ष उफाळला;

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील स्वनिधीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती विरुद्ध जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य असे रणकंदन मंगळवार (दि. २२) च्या अर्थसंकल्पीय सभेत झाले. ‘मानसन्मान आणि स्वनिधी देणार नसाल तर सभागृहात आम्ही हवे आहोत कशाला?’ असे म्हणत सर्व सभापतींनी सभात्याग केला. याउलट सभात्याग करू, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत दबावतंत्राचा वापर करून चार लाखांवरून नऊ लाख स्वनिधी वाढवून घेण्यात सदस्य यशस्वी झाले. अध्यक्षस्थानी विमल पाटील होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्यास यंदा चार लाख स्वनिधीची तरतूद केल्याचे अर्थ समिती सभापती अभिजित तायशेटे यांनी भाषणात सांगितले. भाषण संपल्यानंतर स्वनिधीच्या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी शाहूवाडीचे सभापती पंडित नलवडे म्हणाले, प्रत्येक वर्षी आम्हाला स्वनिधी देतो, असे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात दिला जात नाही. आमची बोळवण केली जाते. आम्हीही सभागृहाचे सदस्य आहोत. मग आम्हाला निधी का नाही? आमच्यावरील हा अन्याय कधी दूर होणार ? या अर्थसंकल्पात आम्हाला स्वनिधी किती देणार ते सांगा अन्यथा आम्ही सभात्याग करू. हातकणंगलेचे सभापती राजेश पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला स्वनिधी न दिल्यास यापूर्वीच्या सर्व योजनांची चौकशी लावू. या सभागृहाचा उर्वरित कालावधीही चौकशीच्या फेऱ्यांत अडकवू.
दरम्यान, पाटील यांच्या ‘योजनांची चौकशी लावू’ या शब्दप्रयोगावर उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्वच सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘खुशाल चौकशी लावा’ असे म्हणत ‘आम्ही काय भ्रष्टाचार केला आहे का?’ असा सवाल उपस्थित केला. यावर सभापती आणि सदस्य यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. चौकशीचा शब्द मागे घ्या, अशी सूचना खोत यांनी केली. सभागृहात निधी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करून निधी मागणे चुकीचे असल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले. त्यावर आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर यांनी मध्यस्थी केली. पाटील यांना त्यांनी शब्द मागे घेण्यास सांगून पडदा टाकला; पण स्वत:चा निधी वाढवून घेण्यात मग्न सदस्यांनी सभापतीच्या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पंचायत समिती सभापतींनी सभात्याग केला.
त्यानंतर सदस्यांनी स्वनिधी वाढवून मिळावा, यासाठी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमचा नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निधी वाढवून मिळावा, अशी मागणी लावून धरली. परंतु, तायशेटे, खोत म्हणाले, आर्थिक तरतूद कमी आहे. निधी देणार कोठून ? अंथरूण पाहून पाय पसरा. निधी वाढवायचा झाल्यास अन्य योजनांवरील पैसे कमी करावे लागतील. या उत्तरानेही सदस्य समाधानी झाले नाहीत.
गेल्या वर्षी १३ लाखांचा स्वनिधी प्रत्येक सदस्यास देण्याचे सभागृहात ठरविले होते; परंतु, काही पदाधिकाऱ्यांनी तो वाढवून घेतला आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी सदस्य संभाजी पाटील, विकास कांबळे, बाबासाहेब माळी, एकनाथ पाटील यांनी केली. वित्त अधिकारी गणेश देशपांडे हे सर्वांना १३ लाख दिल्याचे सांगून बोळवण करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संभाजी पाटील, धैर्यशील माने म्हणाले, १३ लाखांप्रमाणे सर्व सदस्यांचे १३ कोटी रुपये होतात. उर्वरित चार कोटी गेले कोठे याचा हिशेब द्यावा. कोटीने शिल्लक पैशाचा हिशेब कसा लागत नाही? सदस्य राजेंद्र परीट यांनी वाढीव स्वनिधी ‘हम पॉँच’मध्येच वाटून घेतला का, असा सवाल केला.
दरम्यान, या विषयावरून पदाधिकारी आणि वित्त विभाग कोंडीत सापडले. ही संधी साधत सदस्यांनी नऊ लाख स्वनिधीची मागणी लावून धरली. ‘स्वनिधी आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा, वाढीव स्वनिधी मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत सर्व सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. नऊ लाख स्वनिधी द्या, अन्यथा सर्वच सदस्य सभात्याग करतील, असा इशारा देत धैर्यशील माने यांच्यासह सर्वजण बाहेर पडण्यास निघाले. शेवटी उपाध्यक्ष खोत यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी सर्वांना थांबण्याची विनंती केली. अध्यक्ष विमल पाटील, खोत यांनी शेवटी नऊ लाख स्वनिधी देण्याचे मान्य केले.


एकेरी शब्दांचा वापर
मानव विकासासंबंधी परशराम तावरे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नावरून गैरसमज झाल्याने उपाध्यक्ष खोत यांनी ‘आमची चेष्टा करतोस का?’ असा एकेरी शब्दात तावरे यांना जाब विचारला. ‘बाहेर चल,’ असा दमही त्यांनी दिला. माने यांनी हस्तक्षेप
करून ‘असे बोलू नका,’ असे खोत
यांना समजावत वाद
मिटविला.


मागितले आठ... तरतूद नऊ लाख!
चार लाखांवरून आठ लाख स्वनिधी वाढून मिळावा, अशी पहिल्यांदा सर्वच सदस्यांनी मागणी केली. आठ लाख देणे शक्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, गेल्या वर्षीच्या स्वनिधीच्या शिल्लक चार कोटींवरून सदस्यांनी अतिशय नियोजनबद्धरीत्या पदाधिकाऱ्यांची कोंडी केली. ‘चार कोटींचा हिशेब मागत नाही, नऊ लाख स्वनिधी द्या,’ अशी मागणी आक्रमकपणे रेटली. कोंडीतून बाहेर पडण्यास मार्ग सापडत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नऊ लाखांची तरतूद मान्य केली.

मागितले आठ... तरतूद नऊ लाख!
चार लाखांवरून आठ लाख स्वनिधी वाढून मिळावा, अशी पहिल्यांदा सर्वच सदस्यांनी मागणी केली. आठ लाख देणे शक्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, गेल्या वर्षीच्या स्वनिधीच्या शिल्लक चार कोटींवरून सदस्यांनी अतिशय नियोजनबद्धरीत्या पदाधिकाऱ्यांची कोंडी केली. ‘चार कोटींचा हिशेब मागत नाही, नऊ लाख स्वनिधी द्या,’ अशी मागणी आक्रमकपणे रेटली. कोंडीतून बाहेर पडण्यास मार्ग सापडत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नऊ लाखांची तरतूद मान्य केली.

Web Title: Members against the Speaker of the Rakankandhan District Council meeting: Conflicts broke out on funding;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.