‘आरोग्य’च्या कारभारावरून सदस्य संतप्त-- जिल्हा परिषदेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:59 AM2017-09-15T00:59:53+5:302017-09-15T01:01:50+5:30
कोल्हापूर : आरोग्य आणि समाजकल्याण विभागांच्या कारभारावर टीका करीत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत अनेक गोष्टींचा अधिकाºयांना जाब विचारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आरोग्य आणि समाजकल्याण विभागांच्या कारभारावर टीका करीत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत अनेक गोष्टींचा अधिकाºयांना जाब विचारला. शिक्षण आणि पशुसंवर्धन विभागाबाबतही जाब विचारीत सदस्यांनी आमच्या हक्कांवर कोणीही गदा आणण्याचा प्रयत्न करू नये, असे सुनावले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
दुपारी सव्वा वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रा. शिवाजी मोरे यांनी ‘समाजकल्याण’च्या योजनांना पूर्वीप्रमाणे तलाठ्याच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्याची मागणी करीत या विषयाला तोंड फोडले. सतीश पाटील यांनी सदस्यांच्या शिफारशीचा कॉलम का वगळला? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून वातावरण तापले. वंदना जाधव यांनी सदस्यांची शिफारस हवीच, असा आग्रह धरला. वरून सूचना आल्यात का? अशी विचारणा राहुल आवाडे यांनी केले. आमचा हक्क डावलू नका, असे स्वाती सासने म्हणाल्या. शंकर पाटील यांनी ‘समाजकल्याण’मध्ये एजंटांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप केला. समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी दाखल्याबाबत शासनाचा आदेश सांगितला. ‘समाजकल्याण’चे सभापती विशांत महापुरे यांनी सदस्य शिफारस कॉलम टाकून अर्ज छापून घेण्याचे आश्वासन दिले.
सातवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके काही ठिकाणी अजूनही पोहोचली नसल्याचा आरोप राहुल आवाडे यांनी केला. शिये येथे पोषण आहारात रबराचे तुकडे आढळल्याचे पांडुरंग भांदिगरे यांनी सांगितले.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एच. शिंदे यांनी विभागाच्या योजनांची माहिती सांगितल्यानंतर ‘लाभार्थी लॉटरीने निवडणार असाल तर आमचा विरोध असेल,’ असे अरुण इंगवले यांनी निक्षून सांगितले. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर यांनी इतर समित्यांप्रमाणेच लाभार्थी निवडले जातील असे सांगून या विषयावर पडदा पाडला. प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे पुन्हा हजर झाल्याबाबतचा मुद्दा राजवर्धन निंबाळकर आणि जीवन पाटील यांनी उपस्थित केला.
विनायक पाटील यांनी डॉक्टरांच्या रिक्त जागांचा प्रश्न उपस्थित केला. अपुरी औषधे, स्वाइन फ्लूच्या लसींचा तुटवडा, शेळेवाडीत गॅस्ट्रोेची साथ आल्यानंतरही जागेवर नसलेले डॉक्टर या विषयांवर जोरदार चर्चा झाली. गडहिंग्लजचे तालुका वैद्यकीय अधिकारी जबाबदारी झटकतात, असा आरोप सभापती जयश्री तेली यांनी केला. माणसं मेल्यावर औषधे देणार का? असा सवाल वंदना जाधव यांनी विचारला. खुद्द बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर म्हणाले, मी महिन्याभरापूर्वी पत्र देऊनही कारवाई झाली नाही. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी उत्तरे दिली. भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी चर्चेत समन्वय साधला. आजरा सभापती रचना होलम, हातकणंगले सभापती रेश्मा सनदी, रेश्मा देसाई, रसिका पाटील, विजया पाटील, अनिता चौगुले, सुनीता रेडेकर,प्रविण यादव यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.
‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करा
ऊठसूट शाळेत शिकवायचे सोडून जिल्हा परिषदेत येणाºया प्राथमिक शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. करवीरचे सभापती प्रदीप झांबरे म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज बघा. शिकवायचं नाही आणि झेडपीत येऊन कुरघोड्या करत बसायचे. भाजपचे गटनेते अरुण इंगवले म्हणाले, शिक्षक संघटनांचे लाड करू नका. शिरोळचे सभापती मल्लाप्पा चौगुले म्हणाले, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करा.
सहा महिने झाले तरी मानधन नाहीजिल्हा परिषदेवर निवडून येऊन सहा महिने झाले तरी मानधन मिळाले नाही. काय अडचण आहे, अशी विचारणा माजी उपाध्यक्ष बंडा माने यांनी केली. अनेक सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. तेव्हा लौकरच मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले.
शाहू महाराजांसह पालकमंत्र्यांचेही अभिनंदन
शाहू छत्रपती यांना जनरल थिमय्या पुरस्कार मिळाल्याबद्दल, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच कृष्णराज महाडिक, ईश्वरी वरदाळे (इचलकरंजी), रेश्मा माने या क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.