सदस्यांना १६०० रु.ची ‘ब्रिफकेस’
By Admin | Published: March 25, 2015 11:49 PM2015-03-25T23:49:35+5:302015-03-26T00:11:59+5:30
खूश करण्याचा प्रयत्न : वित्त अधिकाऱ्यांकडून विसंगत माहिती
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पाच्या सभेत सदस्यांना तब्बल १६०० रुपयांची ब्रिफकेस भेट देऊन खूश केले. ९० महागडे ब्रिफकेस खरेदी करून परिषदेच्या इतिहासात नवा पायंडा पाडला. त्यामुळे जिल्ह्यात ब्रिफकेस वाटपाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकारी, सदस्य, सभापतींसोबत काही अधिकाऱ्यांनाही ब्रिफकेस भेट मिळणार आहे. ९० ब्रिफकेससाठी १ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, वित्त विभाग ब्रिफकेसच्या संख्येबाबत विसंगत माहिती देत आहेत.
मंगळवारी झालेल्या सभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अविनाश सुभेदार, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी नवीन ब्रिफकेस घेऊन येऊन अर्थसंकल्प मांडला.
सभा सुरू असतानाच परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सदस्यांना अतिशय काळजीपूर्वक सही घेऊन ब्रिफकेस पोहोच केली. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यात प्रथम आल्याबद्दल शासनाकडून २५ लाखांचे बक्षीस मिळाले आहे. त्यातील पाच टक्के निधीतून ब्रिफकेस घेण्याची तरतूद असल्याचे प्रशासन सांगत आहे. (प्रतिनिधी)
बक्षिसांचा विनियोग कसा करावा, यासंबंधी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे स्वतंत्र आदेश काढला आहे. या आदेशात पाच टक्के निधी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च करावा, असे सूचित केले आहे. या नियमानुसार ब्रिफकेस खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
सदस्य आणि सभापतींसाठी जितक्या लागतील तितक्या १६०० रुपयांना एक याप्रमाणे ब्रिफकेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून दिल्या आहेत.
- गणेश देशपांडे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी