लोककल्याण सोसायटीच्या शाखांमध्ये सभासदांचा गोंधळ
By admin | Published: September 15, 2014 11:42 PM2014-09-15T23:42:13+5:302014-09-15T23:47:44+5:30
इचलकरंजीतील घटना : बचत गट सभासदांकडून व्यवस्थापक धारेवर
इचलकरंजी : विविध योजना आणि कर्ज देण्यासाठी गोळा केलेले सभासदांचे पैसे देण्यास विलंब लावत असल्याच्या कारणातून आज, सोमवारी येथील लोककल्याण मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटीच्या सांगली नाका शाखेमध्ये महिला बचत गटांच्या सदस्यांनी गोंधळ घालून शाखाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, भाग्यरेखा चित्रमंदिरजवळील कार्यालयास चार दिवसांपासून टाळे लावल्याने सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या गोंधळातून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीपक नामक व्यवस्थापकास चपलाचा प्रसाद देण्याचाही प्रयत्न केल्याने गोंधळात भर पडली.
‘पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा, धनासोबत मन सांभाळणारी माणसं’ असे ब्रीदवाक्य असलेल्या लोककल्याण मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटीचे प्रधान कार्यालय मुंबई येथे आहे. शहरात भाग्यरेखा चित्रमंदिरजवळ पाटील बिल्डिंगमध्ये आणि सांगली नाका येथे या संस्थेच्या दोन शाखा आहेत. या संस्थेच्यावतीने सभासदांना आकर्षक योजना आखण्यात आल्या होत्या.
विशेष करून महिला बचत गटांना अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे. त्याचबरोबर सोने तारण, वाहन तारण, वैयक्तिक, गृह, ठेव तारण, पीक कर्ज अशा कर्ज योजनाही आहेत. कमीत कमी कागदपत्रात कर्जाची सोय असल्याने विश्वासापोटी अनेकांनी या शाखांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील जवळपास ७०० ते ८०० महिला बचत गटांनींही सभासदत्व घेतलेले आहे. या बचत गटातील प्रत्येक महिला दरमहा ७०० रुपये बचत खात्यात भरतात. तसेच पिग्मीद्वारेही अनेकांनी आपली पुंजी संस्थेकडे दिली आहे; पण गत काही दिवसांपासून या संस्थेचे कामकाज शंकास्पद बनत चालले आहे. महिला बचत गटांना, तसेच सोने तारण कर्जासाठी दिलेले धनादेश परत येऊ लागल्याने सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाग्यरेखा चित्रमंदिरजवळील कार्यालयातील सर्व साहित्य हलविले असून, कार्यालयाला टाळे लावले आहेत; पण त्याच इमारतीत वरील बाजूस एका खोलीत आॅफिस सुरू असल्याचे समजल्यानंतर जमलेल्या महिलांनी तेथे जाऊन दीपक नामक व्यवस्थापकाला धारेवर धरले. गोंधळ वाढतच चालल्याचे पाहून दीपकने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता संतप्त महिलांनी त्याला धरून चपलांचा प्रसाद देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आज, सोमवारी दुपारच्या सुमारास सांगली नाका शाखेत महिला बचत गटांतील सदस्यांनी जाऊन गोंधळ घातला. या शाखेतील संगणकासह अन्य साहित्यही हलविण्यात आले असून, येथे तीन कर्मचारी कार्यरत होते.
येथील शाखाधिकाऱ्यास महिलांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली; पण शाखाधिकारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. यावेळी काही सामाजिक कार्यकर्तेही याठिकाणी जमले होते. त्यांनीही शाखाधिकाऱ्यास खडे बोल सुनावले. यावेळी काही महिलांना अश्रू अनावर झाले होते. (प्रतिनिधी)