औषध निर्मात्याच्या बदलीवरून सदस्य आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:04+5:302021-03-20T04:23:04+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातील औषध निर्माता युवराज बिल्ले यांच्या बदलीवरून भाजप आणि काँग्रेसचे ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातील औषध निर्माता युवराज बिल्ले यांच्या बदलीवरून भाजप आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आमने-सामने आले आहेत.
बिल्ले यांनी कोरोना काळामध्ये औषध भांडार सांभाळले होते. औषध खरेदी, आवक आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना पुरवठा, अशी जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु याच काळात औषध खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केला. तसेच बिल्ले हे अजूनही तेव्हाची कागदपत्रे जुळवाजुळव करत असून त्यांची येथून बदली करावी, अशी मागणी निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार बिल्ले यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील रुग्णालयात बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी प्रशांत लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांनी अजूनही कार्यभार स्वीकारलेला नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी बिल्ले यांच्या बदलीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडे खुलासा मागितला आहे. बिल्ले यांची बदली कोणाच्या दबावाखाली झाली, अचानक बदलीचे कारण काय, त्यांच्या कार्यपध्दतीबाबत आक्षेप होते, तर त्यांना आधी नोटीस दिली होती का? अशी पत्राद्वारे पाटील यांनी विचारणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक घरात बसून होते, तेव्हा बिल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याला औषधे आणि इंजेक्शनचा पुरवठा केला आहे. औषध घोटाळ्याचा संदर्भ घेऊन कोणाच्या तरी हितसंबंधासाठी निरपराधाचा बळी देणे न्याय होणार नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.