हातकणंगले ग्रामसभेत सदस्यांची झाडाझडती
By Admin | Published: January 28, 2015 11:18 PM2015-01-28T23:18:01+5:302015-01-29T00:09:06+5:30
गैैरव्यवहाराचा मुद्दा चर्चेत : खोट्या सह्या करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याचा ठराव
आळते : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या हातकणंगले ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार करून प्रशासन व लोकप्रतिनिधींना निरुत्तर केले. मागील ग्रामसभेला अनुपस्थित राहून नंतर खोट्या सह्या करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याच्या ठरावासह ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्या बदलीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री अपराज होत्या.
हातकणंगले ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने चाललेल्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये अनेक दिवसांपासून संताप खदखदत होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. ही सभा वादळी होण्याचे संकेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला समजल्याने सरपंच जयश्री अपराज यांचा ग्रामसभा गुंडाळण्याचा डाव नागरिकांनी हाणून पाडला. सरपंच अपराज यांनी गणसंख्येअभावी ग्रामसभा तहकूब करीत असल्याचे सांगताच संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करत सह्या घेण्याची मागणी केली. नागरिकांची गर्दी पाहून ग्रामपंचायत सभागृहातील सभा बाजारपेठेतील नेहरू चौकात घेण्यात आली.मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवित असताना ग्रामविकास अधिकारी सिदनाळे यांनी मागील ग्रामसभेला फक्त चार ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असताना सर्वच सदस्य उपस्थित असल्याचे सांगताच आण्णासोा चौगुले यांनी आक्षेप घेत केवळ चारच सदस्य उपस्थित असल्याचे सांगून सदस्यांच्या नंतर खोट्या सह्या घेतल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामविकास अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सभेत एकच गोंधळ उडाला. खोट्या सह्या करून नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकप्रतिनिधींशिवाय अन्य कारभारी मंडळीची लुडबूड चालू असल्याने त्याचा त्रास काही ग्रामपंचायत सदस्यांना व नागरिकांना होत असल्याने कामकाजातील इतरांची ढवळाढवळ बंद करण्याचा ठराव संमत झाला. गावातील सर्वच पाणी कनेक्शन स्टॉप व्हॉल्व्ह बसवावे, घरफाळा व पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा व्हावा, ग्रामसंस्कार वाहिनी दुरुस्त करून त्याचा वापर करावा, बेघर वसाहतीतील घरे भाड्याने देणाऱ्या किंवा विकणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करावी, आदींसह अनेक ठराव मंजूर झाले. (वार्ताहर)
'ग्रामस्थांच्या प्रश्नांना सदस्यांचे मौन
नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सरपंच, काही सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांची भंबेरी उडाल्याने त्यांना बहुतांश प्रश्नांना उत्तरे देण्यास आली नाहीत. तर काही सदस्यांनी मौन धारण केले होते. हातकणंगले गावच्या इतिहासात प्रथमच वादळी ग्रामसभा होऊन कामकाज चव्हाट्यावर आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले, तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी पारदर्शक कारभार करण्याची मागणी मात्र नागरिकांतून होत आहे.