सभासदांचा एकच नारा बंद करा हा खेळ सारा; चित्रपट महामंडळावर सभासदांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 08:26 PM2022-08-26T20:26:05+5:302022-08-26T20:26:17+5:30
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाला निवेदन
कोल्हापूर : महामंडळाचा कारभार सुरळीत करा नाही तर खुर्च्या खाली करा, वादविवाद मिटवा महामंडळ वाचवा, मराठीचा झेंडा जगभर नाचवू पण आधी चित्रपट महामंडळ वाचवू असा नारा देत शुक्रवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीने महामंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. लवकरात निवडणूक घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. तत्पूर्वी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे अधिक्षक शिवराज नाईकवाडे यांनादेखील निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील वादाला कंटाळलेल्या पुण्यातील सभासदांनी शुक्रवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर मोर्चा काढला. तत्पूर्वी दुपारी तीन वाजता धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे अधिक्षक शिवराज नाईकवाडे यांना पुढील तीन महिन्यात निवडणूक घ्या, त्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नाईकवाडे यांनी निवडणूक घेण्यासाठी सभासदांनी कार्यकारिणीकडे मागणी करावी, किंवा धर्मादायकडे रितसर अर्ज करावे असे सांगितले
त्यानंतर मोर्चा चित्रपट महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयाकडे निघाला. चित्रपट महामंडळ बचावचा नारा देत आणि डोक्यावर मी सभासद लिहिलेली टोपी घालून चित्रपट व्यावसायिक महामंडळाच्या दारात आले. मोजक्या चार प्रतिनिधींनी उपाध्यक्ष धनाजी यमकर व कार्यवाह बाळा जाधव यांना निवेदन दिले. यावेळी अभिनेता समद पठाण, सुरेंद्र पन्हाळकर, अनिल गुंजाळ, कुणाल निंबाळकर, संतोष संखद, सचिन वाडकर, साईनाथ जावळकर, मयूरेश जोशी, प्रकाश धिंडले, अरुण चोपदार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारभार डिजीटलवर..
कार्यकारिणीने अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि संजय ठुबे यांनी केलेल्या कारभाराचा लेखाजोखा डिजीटलवरच मांडला. वर्षभरातील आर्थिक गैरव्यवहार यावर मांडत दीडवर्ष कार्यकारिणीची बैठक का घेतली नाही, वार्षिक सभा का घेतली नाही, लेखापरीक्षण कार्यकारिणीसमोर मांडून मंजूर का करून घेतले नाही असे प्रश्न यात विचारण्यात आले. मोर्चातील काही सभासद हे डिजिटल फाडण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या वादावादीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.