‘टेंभू’वरून खासदार-आमदारांत श्रेयवाद

By admin | Published: February 6, 2016 12:11 AM2016-02-06T00:11:41+5:302016-02-06T00:12:03+5:30

निविदेपूर्वीच कामाचे भूमिपूजन : खासदारांच्या साथीला उभारले कॉँग्रेसचे कार्यकर्ते

Members of Parliament and MLAs on 'Thanksgiving' | ‘टेंभू’वरून खासदार-आमदारांत श्रेयवाद

‘टेंभू’वरून खासदार-आमदारांत श्रेयवाद

Next

जगन्नाथ जगदाळे -- माहुली  --टेंभू योजनेच्या कामात आता श्रेयवाद सुरू झाला आहे. भिकवडी हद्दीत टेंभूच्या पाटाच्या दाराच्या भूमिपूजनावरून राजकारण सुरू झाले असले, तरी सध्या या दाराची अवस्था बाजारात तुरी.. अशीच आहे. त्यामुळे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिपूजन केलेल्या टेंभू योजनेच्या कालव्यावरील प्रवेशव्दारामुळे शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व खा. संजयकाका पाटील यांच्यात श्रेयवाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला माहुली परिसरातील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने तो परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ओढ्यात पाणी सोडण्यासाठी भिकवडी बुद्रुक हद्दीत आटपाडीकडे जाणाऱ्या टेंभूच्या कालव्यावर प्रवेशव्दार करून पाणी ओढ्यात सोडण्यासाठी या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कालव्यावर प्रवेशव्दार काढण्याचे नेमके ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच या कामाची निविदाही निघाली नाही. खासदार पाटील यांच्याहस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम मात्र धुमधडाक्यात झाला. कार्यक्रमाला माहुली, वलखडच्या कॉँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावून श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला. आमदार अनिल बाबर यांनाही भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी कॉँग्रेस गटाचे कार्यकर्ते आ. बाबर यांना भेटले होते. कामाची अजून निविदाच नसल्याने बाबर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दिला.
कॉँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांना भूमिपूजनाचा मान दिला. कार्यक्रमाला टेंभूचे अधिकारी, भाजपचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. खासदार संजय पाटील यांनीही घाईगडबडीने भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
‘टेंभूच्या कामासाठी मी रात्रंदिवस कार्यरत आहे. कामाची निविदा नसताना भूमिपूजन कशासाठी? भिकवडी बुद्रुक हद्दीत दार काढून वलखड, माहुली, चिखलहोळच्या ओढ्यात पाणी सोडण्याचा शब्द निवडणूक प्रचारातच मी दिला आहे. येथील दाराबरोबरच अजून एक ठिकाणी टेंभूच्या पाटाला दार काढण्याचे आहे. त्यामुळे निविदा निघाल्यानंतरच कामाचे भूमिपूजन होणार आहे’, असे आमदार बाबर यांनी सांगितले.
दरम्यान, टेंभू योजनेच्या कामाचा श्रेयवाद अजूनही वाढणार आहे. श्रेयवादापेक्षा गटातटाचे राजकारण विसरून सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन टेंभू योजनेला गती देण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. खासदारांनी केंद्र सरकारकडून, तर विद्यमान आमदारांनी राज्य सरकारकडून या कामासाठी भरीव निधी मिळविण्याचा प्रयत्न केला, तर पंधरा वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल. टेंभू योजनेला अजून पोटपाटाची सोय नाही. खानापूर तालुक्याच्या हद्दीवरून पाणी आटपाडी, सांगोल्याकडे जाणार आहे. पण पाटाशेजारी असलेली गावेही अजून टेंभूच्या पाण्यापासून वंचित आहेत.
पाण्यासाठी राजकारण न होता सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन ताकदीने योजना पूर्ण करण्याची गरज आहे. मात्र आतापर्यंत योजना पूर्णत्वापेक्षा गटा-तटाच्या राजकारणातून श्रेयवादासाठीच राजकीय नेत्यांची ताकद खर्ची पडल्याचे चित्र आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र टेंभूच्या पाण्याची आतुरता आहे.

Web Title: Members of Parliament and MLAs on 'Thanksgiving'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.