सदस्यांच्या स्वनिधीला कात्री

By admin | Published: March 25, 2017 12:52 AM2017-03-25T00:52:42+5:302017-03-25T00:52:52+5:30

जिल्हा परिषद : २९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर; स्वनिधी केवळ पाच लाख

Member's sculler | सदस्यांच्या स्वनिधीला कात्री

सदस्यांच्या स्वनिधीला कात्री

Next

कोल्हापूर : लाखो रुपये खर्च करून अटीतटीने निवडून आलेल्या सदस्यांना आगामी आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघासाठी केवळ पाच लाख रुपयांचा स्वनिधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी २०१७-१८ चा २९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर केला. गेल्या वर्षी ४२ कोटी रुपयांचा असणारा अर्थसंकल्प यंदा २९ कोटींवर आल्याने सदस्यांनाही तुटपुंजा निधी मिळणार आहे. अर्थसंकल्पाला विभागीय आयुक्तांची मान्यता घेऊन नंतर तो नवीन सभागृहाच्या माहितीसाठी पटलावर ठेवला जाईल.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. खेमनार म्हणाले, गेल्या काही वर्षांत शासनाची येणी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना स्वनिधी म्हणून मोठा निधी देता आला. मात्र, ही येणी संपल्यामुळे अर्थसंकल्प २९ कोटींवर आला आहे. त्यामुळेच प्रत्येक सदस्याला पाच लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
विद्यानिकेतन शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेसाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यातून पटांगणाचे सपाटीकरण होईल. व्याजाचेही ७० लाख रुपये शाळेकडे शिल्लक आहेत. डिजिटल क्लासरूम व ई-लर्निंगसाठी ४९ लाखांची तरतूद केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शाळाखोलीच्या दुरुस्तीसाठी १५ लाखांची तरतूद केली आहे. जि.प. आवार, भाऊसिंगजी रोड, कदमवाडीकडील जागेवर होर्डिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी आठ लाख रु. खर्च करण्यात येतील. ‘पशुसंवर्धन’तर्फे ५० टक्के अनुदानावर मुक्त गोठा पद्धती संचार पद्धतीस प्रोत्साहन देण्यासाठी २० लाखांची, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आयएसओ मानांकनासाठी ३ लाख, ७५ टक्के अनुदानावर विधवा, परित्यक्ता व दारिद्र्यरेषेखालील महिलांना दोन शेळ्या किंवा २० तलंगा वाटप करणे यासाठी १० लाख, जळितग्रस्त एका जनावरासाठी २० हजार रुपये याप्रमाणे पावणेआठ लाख व गावठी, भटक्या कु त्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीन लाखांची तरतूद केली आहे.अपंग कल्याण विभागांतर्गत अपंग व्यक्तींना कर्करोग, क्षयरोग, मेंदू विकास, हृदय शस्त्रक्रिया अशा दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपये आरक्षित आहेत. अपंग व्यक्तींना टपरी पुरविण्यासाठी २५ लाख, अपंग पालक असतील तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. ‘महिला व बालकल्याण’तर्फे मुली, महिलांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण, एमएसआयटी प्रशिक्षण, पिठाची गिरणी, अंगणवाडी साहित्यासाठी एकूण ९६ लाखांची तरतूद केली आहे.
पत्रकार परिषदेला प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, ‘बांधकाम’चे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

गावाकडचे विद्यार्थी जाणार आयुका/इस्रो भेटीला
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून, यातील गुणानुक्रमे ३६ विद्यार्थ्यांना आयुका / इस्रो या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांची भेट घडविली जाणार आहे. त्यासाठी विमानप्रवासासह होणाऱ्या खर्चासाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
तरुण मंडळांना क्रीडा, व्यायामसाहित्य पुरविणे बंद
एकूणच निधीला मोठी कात्री लागल्याने शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या तरुण मंडळांना ‘क्रीडा, व्यायाम साहित्याचे वाटप’ या योजनेवर निधी धरता आलेला नाही. गेल्या वर्षी या योजनेवर ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र यंदा निधीच निम्म्यावर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मागासवर्गीय वस्तीमध्ये
ओपन जीम
जिल्ह्यातील मोठ्या गावांतील दलित वस्तींमध्ये ओपन जीम उभारण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय मुलींना शाळेत जाण्यासाठी दरवर्षी चार हजार रुपये याप्रमाणे ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: Member's sculler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.