Shahu Maharaj Jayanti संग्रहालयाची निविदा भरलेल्या ठेकेदाराला सदस्यांचाच विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:07 AM2018-06-27T11:07:14+5:302018-06-27T11:11:07+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारणीच्या कामाला पुन्हा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. दोन निविदा अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असताना, या ठेकेदारांना खुद्द राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास) जतन, संवर्धन व विकास समितीच्या सदस्यांनीच विरोध केला आहे.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारणीच्या कामाला पुन्हा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे १३ कोटी रुपयांच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा नव्या मागविलेल्या निविदांमधून दोन निविदा अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असताना, या ठेकेदारांना खुद्द राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास) जतन, संवर्धन व विकास समितीच्या सदस्यांनीच विरोध केला आहे.
शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर झालेल्या चर्चेवेळी समिती सदस्य डॉ. जयसिंगराव पवार आणि इंद्रजित सावंत यांनी ज्या ठेकेदारांनी निविदा भरली आहे, त्यांना आमचा विरोध असल्याचे सांगितले.
संग्रहालय उभारणीच्या कामाचा अनुभव आता निविदा भरलेल्या ठेकेदारांना नसल्याचा दावा करीत यावेळी सावंत यांनी याबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी मात्र ‘शासकीय निधीतून काम करताना जे नियम आहेत, त्यांनुसार त्यांनी निविदा भरली असेल आणि तुमचा विरोध असेल तर मग आता अवघड आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कामासाठी तीन निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने पॅनेलबाहेरील ठेकेदारांच्या निविदा मागविल्या होत्या. पाच निविदा आल्यानंतर त्यांतील तीन नाकारण्यात आल्या. दोन अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असून, त्या निविदा एकाच ठेकेदाराच्या असून, त्यांना डॉ. पवार आणि सावंत यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता पुन्हा पेच निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी जाताना आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्याशीही चर्चा केली.
.
महाराष्ट्रामध्ये १७ संग्रहालये आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभागाचे संचालनालय आहे. या ठिकाणी अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत. मग ज्याला या कामाचा अनुभव नाही, अशा ठेकेदाराला काम कशासाठी द्यायचे, असा आमचा सवाल आहे. त्यामुळे या विभागानेच हे काम हाती घेऊन पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे. म्हणून या ठेकेदाराला आमचा विरोध आहे.
- इंद्रजित सावंत
समिती सदस्य