सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार--रेसिडेन्सी क्लब निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:49 AM2017-10-04T00:49:52+5:302017-10-04T00:50:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रेसिडेन्सी क्लबचे १८०० पैकी १४०० सभासद हे नियमितपणे क्लबमध्ये येत नसतानाही त्यांना पूर्ण वार्षिक वर्गणी भरावी लागते. म्हणून आम्ही सत्तेवर आल्यानंतर अशा सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार असल्याची घोषणा प्रोग्रेसिव्ह ग्रुप (ओरिजिनल)चे आघाडीप्रमुख दिलीप मोहिते यांनी केली.
रेसिडेन्सी क्लबची त्रैवार्षिक निवडणूक ८ आॅक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर या आघाडीचे प्रमुख आणि उमेदवारांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला जाहीरनामा घोषित केला.
याबाबत बोलताना आनंद माने म्हणाले, सन १८९८ मध्ये तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या या क्लबची नोंदणी सन १९९० च्या दरम्यान केली. सर्व समाजातील घटक या क्लबमध्ये तेव्हापासून सक्रिय झाले आणि प्रोग्रेसिव्ह ग्रुपचा पाया रचला गेला. सन २००५ मध्ये अण्णासाहेब मोहिते यांचे नेतृत्व लाभल्यानंतर कै. दीपक पाटील-सडोलीकर, दिलीप चिटणीस आणि आनंद माने यांनी क्लबमध्ये अनेक विकास योजना राबविल्या.
पूर्वी कोणालाही सहजासहजी न दिसणाºया क्लबमध्ये नवीन प्रशस्त रेस्टॉरंट व बारची इमारत उभारली.
नावीन्यपूर्ण बॅन्कवेट हॉल, बॅडमिंटन हॉल व टेबल टेनिस रूम, कॅरम व कार्ड रूम, बिलीयर्ड रूम नूतनीकरण, नवीन एन्ट्रन्स लॉबी व कॉफी शॉप, ग्लास बॅक स्कॅश कोर्ट, अद्ययावत जीम, खोल्यांचे नूतनीकरण, देशातील अनेक क्लबशी करार, परिसर सौंदर्यीकरण केले. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये प्रशासनामध्ये सचिव आणि पदाधिकाºयांची मनमानी, एकाधिकारशाही, गैरव्यवहार आणि अपारदर्शी कारभार सुरू झाल्याने सभासदांच्या आणि क्लबच्या हितासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत, असे दिलीप मोहिते आणि आनंद माने यांनी सांगितले.यावेळी उमेदवार दिलीप चिटणीस, अभिजित मगदूम, रवींद्र पाटील-सडोलीकर, रणजित शहा, प्रशांत काळे, डॉ. सत्यव्रत सबनीस,चंद्रकांत राठोड, अभय देशपांडे, दिलीप जाधव, श्रीकांत मोरे, सचिन घाटगे, सुशील चंदवाणी, गिरीश रायबागे उपस्थित होते.
साहित्य नेले बाहेर
क्लबमधील अनेक प्रकारचे साहित्य बाहेर नेले आहे. तशी नोंद रजिस्टरमध्ये केली आहे. स्क्रॅप करण्यासाठी, जिमचे साहित्य खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया सचिवांनी राबविलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले.