आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:08 AM2017-08-18T00:08:23+5:302017-08-18T00:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा घणाघाती आरोप करीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकर यांचा समाचार घेतला.
अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संपर्क दौºयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक दिनकर पाटील होते. राधानगरीतील पालकरवाडी, कसबा वाळवे, चंद्रे, शेळेवाडी, माजगाव, तळाशी, अर्जुनवाडा, तिटवे या गावांचा सत्तारूढ के. पी. पाटील गटाने संपर्क दौरा केला.
पाटील म्हणाले, ज्या कारखान्याचा ऊस दर राज्यात प्रथम क्रमांकावर नेला, आमच्या संचालक मंडळाने सहवीज प्रकल्प यशस्वी करून दाखविला. तो कसा बंद पडेल याचसाठी आटोकाट प्रयत्न करता मग तुम्ही सभासद हिताचे काय निर्णय घेणार? असा सवाल करीत १९९८ साली एक गुंठा जमीन नावावर नसणाºया आबिटकर यांना सभासद केले त्यावेळी आम्ही बरे होतो, मग तुमच्या आज पोटात का दुखते?
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बाजार समितीचे संचालक नेताजीराव पाटील, ‘बिद्री’चे माजी संचालक भिकाजी एकल, पंडित केणे, जि. प. सदस्य जीवन पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, युवराज वारके, मधुआप्पा देसाई, शरद पाटील, शहाजी बरगे, उमेश भोईटे, नानासो पाटील, आप्पासो देसाई, आप्पासो आबदार, अशोकराव फराकटे, सुनील वारके, पंडित पाटील, आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. दिनेश माळे यांनी आभार मानले.
सभासद अपात्र करून तुम्ही काय साधले?
बिद्री साखर कारखान्याला सभासद करताना आम्ही कधीही गटातटाचा विचार केला नाही, सहवीज प्रकल्प यशस्वी व्हावी हा एकच उद्देश होता. मात्र, आमदार आबिटकर आणि मंडळींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. जो शेतकरी आहे, ऊस पिकवितो, कार्यक्षेत्रातील आहे, त्याला अपात्र करून तुम्ही काय साधले? असा सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. माझे पाहुणे निगवे येथे जमीन कसतात, आमदार मुश्रीफ यांचे चिरंजीव बोरवडे गावचे खातेदार आहेत त्यांचा ऊस ‘बिद्री’ला येतो मग हे कार्यक्षेत्रातले नव्हेत का ? सोशल मीडियावरून दिशाभूल करू नका, या निवडणुकीत उद्या तुम्हीच अपात्र होणार आहात, असे पाटील म्हणताच उपस्थित सभासद शेतकºयांनी दाद दिली.