शॉर्ट फिल्म मेकर्सना महामंडळाचे सदस्यत्व
By admin | Published: February 5, 2017 12:54 AM2017-02-05T00:54:35+5:302017-02-05T00:54:35+5:30
मेघराज राजेभोसले : रामभाऊ चव्हाण (दादा) लघुपट महोत्सवाला सुरुवात
कोल्हापूर : शॉर्ट फिल्ममधूनच उद्याचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार घडणार आहेत; त्यामुळे अशा शॉर्ट फिल्म मेकर्सना चित्रपट महामंडळाशी जोडण्यासाठी लवकरच घटनादुरुस्ती करून त्यांना सदस्यत्व देण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली.
येथील मराठी नाट्य-चित्रपट कलाकार-तंत्रज्ञ मल्टीपर्पज असोसिएशनतर्फे शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित ‘रामभाऊ चव्हाण (दादा) लघुपट महोत्सव २०१७’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
ते म्हणाले, कोल्हापूरच्या चित्रनगरीचे काम पूर्ण होत असून चित्रीकरणाला सुरुवात करता येणार आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञ, कलाकार स्थानिक पातळीवरच तयार व्हायचे असतील तर लघुपट हे महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. अशा लघुपट दिग्दर्शकांना, निर्मितीखर्च मिळावा; त्यातून उद्याचे कलाकार, तंत्रज्ञ घडणार आहेत. यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या लघुपटकर्त्यांना व्यासपीठ देण्यासाठी स्थानिक पातळीवर संलग्न संस्थांची मदत होत आहे. यामुळे स्थानिक कलावंतांना बळ मिळत आहे. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री गुलाबबाई वंटमुरीकर, सरोज सुखटणकर, कॅमेरामन प्रकाश शिंदे, कलापथक अभिनेत्री मंगला विधाते यांचा सत्कार करण्यात आला. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. असोसिएशनचे अध्यक्ष आकाराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. या महोत्सवांतर्गत आज, रविवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध लघुपट दाखविण्यात येणार आहेत. त्यासाठी मोफत प्रवेश आहे. सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना पारितोषिके देण्यात येणार असून, चित्रपट महामंडळ एकवीस हजार रुपयांची मदत देणार आहे.
महोत्सवात आज दाखविण्यात येणारे लघुपट
गोल्डन टॉयलेट, बाप, बिऱ्हाड, केले का छिल्का, गाईडन्स, सौंदर्या, स्मुटी, डोहाळे, ब्लॅकमेल, एक पाऊल, सरस्वती शहाणी, दूर्गा, स्ट्रगलर, व्यसन, बलुतं, आधार, एक क्षण, माझं लगीन हलगीसंगं, मक्तूब, नॉस्टेल्जीया, सिया, निरसी, स्मिक, जिव्हाळा, रत्ना, ट्रेस, मंगळ वारी, ब्लाइंड्स, सावट, अग्रस्त, जनरेशन आॅफ इडियट्स, ट्रॅफिक सेल्फ कमिट.