मनोमिलन अधांतरी!

By Admin | Published: October 22, 2016 11:23 PM2016-10-22T23:23:55+5:302016-10-23T00:46:53+5:30

संवाद होईना : ‘नविआ’कडून ४० जागा लढण्याची तयारी

Memento! | मनोमिलन अधांतरी!

मनोमिलन अधांतरी!

googlenewsNext

सातारा : दहा वर्षांपूर्वी झालेल्या साताऱ्यातील ऐतिहासिक मनोमिलनात दरार पडण्याची परिस्थिती पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून ‘रिस्पॉन्स’ मिळत नसल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीने ४० जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजप व इतर मित्रपक्षांच्या जम्बो महायुतीचे आव्हान पुढे असताना साविआ व नविआ एकत्रित लढण्याचा निर्णय शनिवारी रात्रीपर्यंत झालेला नव्हता. मनोमिलनाचा निर्णयच होत नसल्याने अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. ज्यांचा असा कोंडमारा झाला आहे, त्यांना महायुतीची आघाडी खुणावत आहे. त्यातच विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांनी स्वतंत्रपणे प्रचार कार्यालयेही थाटली असून, वैयक्तिक प्रचार सुरू केला आहे. मनोमिलनाचा निर्णय होईल तेव्हा होईल; परंतु आपण सज्ज असायला हवे, या भूमिकेतून विद्यमान नगरसेवकांपैकी बहुतांश मंडळींनी काम सुरू केले आहे.
दरम्यान, मनोमिलनाच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले तर शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात आल्यानंतर उदयनराजे मुंबईला निघून गेल्याची जोरदार चर्चा आहे. या परिस्थितीत नक्की काय निर्णय घ्यायचा, याचा पेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पडल्याची चर्चा आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार असल्याने शनिवारी नगरविकास आघाडीकडूनही स्वतंत्र लढण्यासाठी आमदारांकडे आग्रह धरला गेला. या परिस्थितीत नगरविकास आघाडीच्या ४० उमेदवारांची यादी तयार झाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. २४) पासून सुरुवात होणार आहे.
शनिवार (दि. २९) ही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची अंतिम मुदत आहे. आगामी दोन दिवसांत निर्णय झाला नाही, तर कदाचित नगरविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ
शकतात.


‘तिरंगी लढतीचे चित्र
सध्या तरी सातारा पालिकेच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी व जम्बो महायुती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता पुढे येत आहे.
सुरुची’वर इच्छुकांची गर्दी !
सातारा पालिकेच्या निवडणुकीत मनोमिलन होणार की नाही, याची साशंकता असताना इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. ‘तुमचे मनोमिलन होऊ किंवा न होऊ; पण आम्हाला तुमच्या आघाडीकडून उमेदवारी द्या,’ अशी मागणी अनेक इच्छुकांनी शनिवारी सायंकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर जाऊन केली.

Web Title: Memento!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.