साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

By उद्धव गोडसे | Published: July 3, 2023 12:36 PM2023-07-03T12:36:27+5:302023-07-03T12:36:59+5:30

उद्धव गोडसे कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाताच सोशल मीडियात मीम्स आणि संदेशांचा ...

Memes on social media as NCP leader Ajit Pawar along with his supporting MLAs went with the Shinde Fadnavis government | साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाताच सोशल मीडियात मीम्स आणि संदेशांचा महापूर आला. शरद पवारांनी भाकरी फिरवली अन् अजितदादा तवाच घेऊन पळाले. अजित पवार पहाटे झोपू देत नाहीत आणि दुपारीही. गौतमी पाटीलचा तमाशा बरा; पण महाराष्ट्राचे राजकारण नको... अशा अनेक संदेशांनी लोकांचे मनोरंजन करतानाच सध्याच्या राजकारणावर नेमके भाष्य केले.

रविवार सुटीचा दिवस म्हणून अनेकांनी चमचमीत भोजनावर ताव मारून पावसाच्या सरींचा अंदाज घेत, आळस देत वामकुक्षीसाठी पाय पसरायला सुरुवात केली होती. तोच महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या भूकंपाची बातमी येऊन धडकली आणि अनेकांची झोप उडाली. दुपारी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. सोबतच राष्ट्रवादीच्या अन्य आठ मंत्र्यांनी शपथा घेतल्या.

पुढे सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप, स्पष्टीकरण, खुलासे यामुळे वातावरण ढवळून निघाले. याचे प्रतिबिंब सोशल मीडियातही उमटले. यात अनपेक्षित धक्क्यापासून ते सत्तापिपासू राजकारणापर्यंत अनेक संदेशांनी महाराष्ट्राचे मनोरंजन केले आणि विचार करायलाही भाग पाडले.

चर्चेतील मिम्स, संदेश

  • मतदान कार्ड विकणे आहे.
  • पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी... राजकारणाचा चिखल.
  • निवडणूक आयोगाला नम्र विनंती; आता यापुढे मतदारांच्या बोटावर शाईऐवजी चुना लावा.
  • ईडी, सीबीआयवाले खुश; कामाचा ताण संपला, सुटी जाहीर.
  • आता काय..? १०० खोके एकदम ओक्के?
  • चमत्कार! साडेतीन वर्षांत महाराष्ट्रात सर्व पक्ष सत्तेत आणि विरोधातही.
  • अर्धी राष्ट्रवादी देवेंद्रवासी.
  • शिंदे गटाचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला.
  • सरकार कोणतंही असूद्या, अजित पवारांना परमनंट उपमुख्यमंत्री करायचा कायदाच करा आता.
  • किरीट सोमय्या आता कागलच्या उरुसात जेवायला येणार.
  • शिंदे गटाची अडचण... सासूसाठी वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली.
  • बाप चोरला... त्यानंतर आता पुतण्या चोरला.
  • नो डोंगर, नो झाडी, नो हॉटेल... थेट राजभवन.
  • एकाचेही मत वाया नाही गेले. ज्याला ज्याला मत दिले ते ते सत्तेत गेले.
  • अजून एक उपमुख्यमंत्री करा म्हणजे तीन शिफ्टमध्ये काम करतील - एमआयडीसी कार्यकर्ता
  • मोदी आणि राहुल गांधी एकत्र आले म्हणजे आता आम्ही डोळे मिटायला मोकळे.
  • अशा अनेक संदेशांतून लोकांनी राजकीय नाट्यावर भाष्य केले.


मीम्सची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कीर्तनकार इंदुरीकर महाराज, अण्णा हजारे, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एडिट केलेले व्हिडीओ आणि त्यावर विनोदी ढंगाने केलेले भाष्य मीम्सद्वारे व्हायरल झाले. जितकी राजकीय नाट्याची चर्चा रंगली तितकीच त्यावरील मीम्स आणि मेसेजचीही चर्चा झाली.

Web Title: Memes on social media as NCP leader Ajit Pawar along with his supporting MLAs went with the Shinde Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.