पोलंडमध्ये साकारणार कोल्हापूरच्या मैत्रीचे स्मारक : अॅडम बुरक्वोस्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:44 PM2019-03-26T14:44:01+5:302019-03-26T14:54:07+5:30
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे नागरिक अडचणीत असताना कोल्हापूरने त्यांना केवळ आश्रय नव्हे तर उत्तम सेवा सुविधा दिल्या. पोलंड आणि कोल्हापूरचे हे जिव्हाळ््याचे नाते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पोलंडमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतची दिशा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात स्पष्ट होईल अशी माहिती पोलंडचे राजदूत अॅडम बुरक्वोस्की यांनी मंगळवारी दिली.
कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे नागरिक अडचणीत असताना कोल्हापूरने त्यांना केवळ आश्रय नव्हे तर उत्तम सेवा सुविधा दिल्या. पोलंड आणि कोल्हापूरचे हे जिव्हाळ््याचे नाते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पोलंडमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतची दिशा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात स्पष्ट होईल अशी माहिती पोलंडचे राजदूत अॅडम बुरक्वोस्की यांनी मंगळवारी दिली.
दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आश्रय दिला. त्यांच्यासाठी वळीवडे येथे कॅम्प उभारून सर्व सेवा सुविधा पुरवण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात त्या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत.
न्यु पॅलेस येथे शाहू छत्रपती यांनी पोलंडचे राजदूत अॅडम बुरक्वोस्की यांना राजर्षी शाहू महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना सप्टेंबर महिन्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पोलंडचे राजदुत पोलंडचे राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्त डेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यु, रॉबर्ड डेझीडिस्क हे अधिकारी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
महावीर उद्यान येथे शांतीदूत स्तंभाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कर्नल विजयसिंह गायकवाड, कॅप्टन शिवाजी महाडकर, रविराज निंबाळकर उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, ब्रिटीश भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि त्यांनी देशावर राज्य केले. परत जाताना ते आपल्या दृष्टीने शत्रूच राहिले. पण पोलंडचे नागरिक येथे आश्रयाला आले. कोल्हापूर आणि जामनगर या दोनच संस्थानांनी त्यांना आधार दिला. हे पोलंडवासिय कोल्हापूरच्या मातीत रु ळले, जगले आणि परत जाताना आपले मित्र बनले. हा दोन देशातल्या मानसिकतेतला फरक आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी वळीवडे कॅम्प, शिवाजी विद्यापीठ, सेंट झेविअर्स ताराराणी चौकाजवळील पोलिश स्मशानभूमीस भेट दिली. सप्टेंबरमध्ये पोलंडच्या राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्याचे नियोजन सध्या सुरू आहे.
कोल्हापूची मिरची आणि चप्पल
कोल्हापूरमध्ये तुम्हाला काय आवडले यावर अॅडम म्हणाले, कोल्हापुरचे जेवण मला खूप आवडले कारण त्यात मिरची खूप असते आणि मला मिरची आवडली. इथले जेवण रुचकर आहे. कोल्हापुरी चप्पलही मी घेतली आहे.