Lata Mangeshkar: लतादीदींचे कोल्हापूरशी होतं खास नातं, वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी यायच्या कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:26 AM2022-02-06T11:26:02+5:302022-02-06T11:43:03+5:30
वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी त्या कोल्हापुरात यायच्या
कोल्हापूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर या लतादीदींच्या जडणघडणीची मुळे कलापूर असलेल्या कोल्हापुरात रोवली गेली. लता मंगेशकर यांना दीनानाथ यांनी आपल्या फिल्म कंपनीत संधी दिली, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरात
लता मंगेशकर या मूळच्या मध्यप्रदेशमधल्या. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. आई माई मंगेशकर आणि उषा, आशा, मीना व हृदयनाथ यांच्यासह लतादीदी कोल्हापुरात आल्या. सुरुवातीच्या काळात मंगेशकर कुटुंब मंगळवार पेठ खरी कॉर्नर येथे बाबूराव पेंटर यांच्या घराजवळ राहायचे. कुटुंब चालवण्यासाठी त्या मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये काम करू लागल्या. त्यांची कारकीर्द खरंतर १९४२ च्या दरम्यान बालअभिनेत्री म्हणून सुरू झाली.
पुढे मास्टर विनायक यांनी आपल्या फिल्म कंपनीचे मुंबईला स्थलांतर केल्यानंतर त्यांचे कर्मचारीही मुंबईला स्थायिक झाले. पुढे त्यांना भालजी पेंढारकर यांचा सहवास लाभला. भालजी कोल्हापुरात आल्यानंतरही त्यांचा लतादीदींशी स्नेह कायम होता. त्या वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी कोल्हापुरात यायच्या. कोल्हापुरात फिरण्यासाठी एक गाडी मात्र त्यांच्यासाठी ठेवलेली असायची.