व्यापाऱ्यांचा संप मागे;
By admin | Published: July 14, 2016 12:43 AM2016-07-14T00:43:07+5:302016-07-14T00:43:07+5:30
बाजार समिती आजपासून सुरू
कोल्हापूर : राज्य शासनाने पणन कायद्यात सुधारणा करून कांदा-बटाटा, फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याने व्यापाऱ्यांनी सोमवार (दि. ११)पासून सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी रात्री मागे घेतले. व्यापारी महासंघ व राज्य शासनाच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आज, गुरुवारपासून व्यवहार सुरू होईल. आज सकाळी ११ वाजता व्यापाऱ्यांनी पुढील दिशा निश्चित करण्यासाठी बैठक बोलविली आहे.
तीन दिवस बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने त्याची गंभीर दखल घेतली. शेतकरी बाजार समितीत आले तर त्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी समित्यांना दिले होते. त्यामुळे संचालक मंडळ जागे झाले. कोल्हापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत या आदेशाची चर्चा झाली. व्यापारी असोसिएशनची मुंबईत चर्चा सुरू आहे, त्यातून मार्ग निघेल, असे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. प्रथम बाजारपेठ सुरू करा आणि मग चर्चा सुरू ठेवा, अशी भूमिका सभापती परशराम खुडे व उपसभापती विलास साठे यांनी घेतली.
बंद थांबवा : ११० व्यापाऱ्यांना नोटिसा
बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे थांबवून पूर्ववत व्यवहार सुरू करा; अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल, अशा नोटिसा बुधवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने ११० कांदा-बटाटा, फळे-भाजीपाला व्यापाऱ्यांना लागू केल्या होत्या. सरकारच्या पातळीवरून समितीच्या प्रशासनावर दबाव असल्याने संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसले. (प्रतिनिधी)