जागेच्या व्यवहारात मुंबईतील व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 02:02 PM2019-01-18T14:02:29+5:302019-01-18T14:04:55+5:30
कोल्हापूर : कंदलगाव येथील बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना करुन मुंबईतील व्यापाऱ्याच्या तीन गुंठे रिकामा प्लॉटची परस्पर विक्री करुन तीन ...
कोल्हापूर : कंदलगाव येथील बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना करुन मुंबईतील व्यापाऱ्याच्या तीन गुंठे रिकामा प्लॉटची परस्पर विक्री करुन तीन लाख रुपयांना गंडा घातलेप्रकरणी तत्कालीन करवीर तहसिलदार, तत्कालीन कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांचेसह दहा जणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला.
संशयित समित जयसिंगराव नागेशकर, जितेंद्र चंद्रकांत शिरोडकर, मयुरेश गोविंदराव नागेशकर, गायत्री गोविंदराव नागेशकर, विरेंद्र चंद्रकांत शिरोडकर, सोनल गोविंदराव नागेशकर, वृंदा उर्फ वृषाली माधवराव नाईक (सर्व रा. कोल्हापूर), तत्कालीन करवीर तहसिलदार, कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी, कंदलगाव येथे १२६ गुंठे जमिन आहे. संशयित समित नागेशकर व जितेंद्र शिरोडकर यांनी बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना तयार केला आहे. त्यातील भूषण गोविंद कलगुटकर (रा. मालाड, पूर्व, मुंबई) यांच्या नावावर असलेली तीन गुंठे जागा १६ एप्रिल २०१४ रोजी तत्कालीन करवीरचे तहसिलदार, कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांना हाताशी धरुन परस्पर विक्री केली.
हा व्यवहार कसबा बावडा येथील दस्तनोंदणी निबंधक कार्यालयात झाला. कलगुटकर यांच्या हा प्रकार लक्षात आलेनंतर त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.