कोल्हापूर विश्रामगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल
By admin | Published: August 29, 2014 12:19 AM2014-08-29T00:19:09+5:302014-08-29T00:32:55+5:30
एमएसआरडीसीची योजना : कावळा नाका परिसरासाठी निविदा प्रक्रीयेस सुरुवात
कोल्हापूर : सार्वजनिक विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वापरात असलेल्या, मात्र दीड वर्षे कुलूपबंद असलेल्या ताराराणी चौकातील विश्रामगृहाची मालकी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचीच (एमएसआरडीसी) आहे. शासन आदेशाच्या १६ वर्षांनंतर विश्रामगृहाचा भार सोसवेना म्हणून हस्तांतरण करण्यात आले. आता या विश्रामगृहाचे व्यावसायीक व्यापारी संकुलात रूपांतर करण्याची योजना महामंडळाने आखली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
‘पीडब्ल्यूडी’ची मालकी असलेले स्टेशन रोडवरील अप्पर जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान व ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृह नूतनीकरणासाठी १९९७ ला ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला. अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ‘पीडब्ल्यूडी’च्या इमारत बांधण्यासाठी त्रयस्त संस्थेला पाचारण करण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेली १६ वर्षे नूतन इमारतींची पायाभरणीही ‘एमएसआरडीसी’ला करता आली नाही. दरवर्षी नवा आराखडा सादर करण्यापलीकडे काही हालचाल झाली नाही. यातच गेल्या तीन वर्षांत शहर रस्ते प्रकल्पामुळे ‘टार्गेट’ ठरलेल्या महामंडळाने कोल्हापुरातील कार्यालय बंद करून पुण्यात बस्तान हलविले.पीडब्ल्यूडी’कडून विश्रामगृहाचा मार्च २०१३ पर्यंत वापर होत होता. दरम्यान, २००९ ला ताराबाई पार्कातील नवीन शासकीय विश्रामगृह सुरू झाले. हवेशीर व प्रशस्त इमारतीमुळे नवीन विश्रामगृहातच राबता वाढू लागला. यानंतर कमी दर्जाचे ठरत गेलेले ताराराणी चौकातील विश्रामगृह राजकीय कार्यकर्त्यांचा अड्डा बनू लागल्याने दीड वर्षापूर्वी ‘पीडब्ल्यूडी’ने विश्रामगृहास टाळे ठोकले होते. दोन हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागा व्यापलेल्या विश्रामगृहावर १२ प्रशस्त खोल्या (सूट) व पार्किंगची व्यवस्था ‘एमएसआरडीसी’ करणार आहे. उर्वरित जागेवर व्यावसायिक इमारतींचे प्रयोजन असल्याचे समजते.
दीड वर्षापूर्वीच हस्तांतरण
विश्रामगृहाच्या हस्तांतरणाचा १९९७ चा शासन आदेश आहे. यानुसार दीड वर्षापूर्वीच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. विश्रामगृहाच्या विकासाबाबात सर्वस्वी निर्णय ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित आहे.
- एन. एम. वेदपाठक, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी