व्यापाऱ्यांच्या दुकाने बंदला कोल्हापूर शहरात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 02:06 PM2021-06-09T14:06:54+5:302021-06-09T14:09:39+5:30
corona virus Kolhapur : अनलॉकमध्ये सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा अशा आशयाचे फलक हातात घेवून लक्ष वेधले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : अनलॉकमध्ये सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा अशा आशयाचे फलक हातात घेवून लक्ष वेधले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत काल शहरातील सर्वच अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेसह सर्वच व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व्यवसाय बंद ठेवून व्यापाऱ्यांनी जागेवरच विनाघोषणा हातात फलक घेऊन आंदोलन केले.
कोरोनामुळे दोन महिने अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय निर्बंधांनुसार बंद राहिले. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले. सर्व व्यवसाय सुरू करण्याचे शासनाने अद्यादेश काढावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांची होती. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता, पण ४ जूनच्या अध्यादेशानुसार पुन्हा जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त इतर व्यवसाय बंद राहणार हे स्पष्ट झाल्याने अस्तित्वासाठी व्यापारी रस्त्यावर उतरत असल्याचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.
या आंदोलनात स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, प्लायवूड डिलर्स असोसिएशन, जिल्हा फूटवेअर्स असोसिएशन, वाईन मर्चंट्स असोसिएशन, हॉटेल मालक संघ, जिल्हा बार असोसिएशन, सराफ व्यापारी संघ, जिल्हा सराफ संघ, कापड व्यापारी संघ, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, आयटी असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, रेडिमेड गारमेंट्स असोसिएशन, इलेक्ट्रिक असोसिएशन, भांडी व्यापारी असोसिएशन, टू व्हिलर स्पेअर पार्टस् असोसिएशन तसेच औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनातून अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने, किरणा दुकाने, भाजीपाला विक्री याना वगळण्यात आले होते.आंदोलनात राजारामपुरी व्यापारी असोसिएशननेही भाग घेतला तसेच या व्यवहार बंदला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला आहे.