अडत भरायची नसेल तर व्यापाऱ्यांच्या दारात माल
By admin | Published: July 16, 2016 12:31 AM2016-07-16T00:31:31+5:302016-07-16T00:32:41+5:30
राजू शेट्टी : मुंबईत भाजी मार्केट सुरू करण्याची खोत यांची घोषणा
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न असून, अडत भरायची नसेल तर बाजार समितीच्या बाहेर व्यापारी सांगतील तिथे माल पोहोचविला जाईल; पण भांडण लावून आपली पोळी भाजून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना दिला.
नियमन व अडत याबाबत शुक्रवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत काळानुरूप बाजार समित्यांनीही बदलले पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी व्यापाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. शेतकऱ्यांनी माल पिकविला तर आपण खाणार, याचे भान व्यापाऱ्यांनी ठेवावे. किरकोळ व्यापारी येथून पाच टक्केच माल खरेदी करतात. मग त्यांच्यासाठी ९५ टक्के बड्या व्यापाऱ्यांचा फायदा का करता? लिलावात कमी दराने मागितले म्हणून शेतकरी कधी तुमच्याशी भांडत नाहीत. मध्यस्थी कमी करून ग्राहकांना स्वस्तात व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला अडत भरायची नसेल तर शेतकऱ्यांना सांगा. समितीच्या बाहेर सांगाल तिथे माल पोहोचविला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. समित्याही टिकल्या पाहिजेत; पण त्यांनीही बदलून आॅनलाईन ट्रेडिंग सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, व्यापाऱ्यांना समितीबरोबर समितीच्या बाहेर खरेदीसाठी लायसेन्स दिली जाणार असून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्ड स्टोअरेज, शेतीमालावर बॅँक कर्ज, आदी बाबी प्रामुख्याने करणार आहेच. त्याबरोबर शेतकरी मंडळ, भाजीपाला सहकारी संस्थांच्या माध्यमातून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असून पुणे गृहनिर्माण संस्थेत असा प्रयोग सुरू केला आहे. आरे (मुंबई) दूध विक्री केंद्राच्या ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करणार आहे. (प्रतिनिधी)
...तर समित्यांच्या
पाठीशी सरकार
बाजार समित्यांनी कामाची पद्धत बदलली पाहिजे. नुसते घेणाऱ्यांवर व देणाऱ्यांवर अवलंबून राहिलात तर टिकणार नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी करून थेट ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली पाहिजे. शहरात स्वत:ची विक्री केंद्रे सुरू करावीत, अशा बाजार समित्यांच्या पाठीशी सरकार राहील, अशी ग्वाही सदाभाऊ खोत यांनी दिली.
बाराजणांची
अभ्यास समिती
अडतीबाबत नेमल्या जाणाऱ्या समितीत बाराजणांचा समावेश असून मोठ्या बाजार समित्यांच्या प्रतिनिधींसह सर्व घटकांना
सामावून घेणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या दोन-तीनजणांना प्रतिनिधित्व देऊ. ही समिती ६ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.