‘मेरी वेदर’ प्रतिष्ठेचा प्रश्न राजकीय रंग : प्रदर्शनाला विरोधासाठी क्रीडापे्रमींचे आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:40 AM2018-01-19T00:40:35+5:302018-01-19T00:40:59+5:30
कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावरील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘भीमा कृषी प्रदर्शन २०१८’ला राजकीय रंग चढला असून, हे कृषी प्रदर्शन आता महाडिक-पाटील या दोन्हीही
कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावरील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘भीमा कृषी प्रदर्शन २०१८’ला राजकीय रंग चढला असून, हे कृषी प्रदर्शन आता महाडिक-पाटील या दोन्हीही गटांकडून प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दरम्यान, या परिसरात खेळोत्तर कारणांसाठी कोणतेही दुसरे मैदान उपलब्ध नसल्याने हा विषय राजकीय न बनविता हे मैदान फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यावे व सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पसिरातील खेळाडूंनी गुरुवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
हे मैदान खेळाडूंसाठीच आरक्षित राहावे यासाठी खेळाडूंनी आयुक्त डॉ. चौधरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. तसेच शासन आदेशाने हे मैदान १९ सप्टेंबर १९८० रोजी हस्तांतरित झाले आहे; त्यामुळे त्याची मालकी कोल्हापूर महापालिकेकडे आहे. शासन आदेशामध्येही खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी या मैदानाचा वापर न करण्याची अट शासनाने घातली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंग न देता खेळाडूंचा विचार करून हे मैदान फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यावे, तसेच खेळाव्यतिरिक्त अन्य प्रदर्शनांसाठी अगर व्यावसायिकतेसाठी अन्य ठिकाणी मैदान राखीव ठेवावे, अशीही मागणी क्रीडाप्रेमींनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय प्रदर्शनासाठी हे मैदान दिल्यानंतरचा यापूर्वीचा अनुभव वाईट असून, मैदानातील खड्डे बुजविण्याचे काम खेळाडूंना करावे लागते.
यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, खेळाडू संजय साळोखे, जमील अथणीकर, शीतल कदम, मिलिंद देसाई, संग्राम सरनोबत, निवास वाघमारे, माणिक ठाकूर, बाजीराव कुंभार, सागर पोतनीस, रविराज
शिंदे, प्र्रकाश जगदाळे, आदी उपस्थित होते.
ठरावास सर्वच गटनेते सूचक-अनुमोदक
मेरी वेदर मैदान आणि सासने मैदान खेळाव्यतिरिक्त कशासाठीही देऊ नये, असा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत २० मार्च २०१७ रोजी करण्यात आला आहे. ठराव सूचक म्हणून शारंगधर देशमुख व सुनील पाटील, तर अनुमोदक म्हणून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम आणि विरोधी किरण शिराळे हे आहेत. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला महापालिकेने परवानगी नाकारली. त्यातच स्वप्निल शेवडे या नावाने मेरी वेदर मैदान यापूर्वीच २० ते ३० जानेवारीदरम्यान क्रिकेटच्या स्पर्धेसाठी बुक केले आहे.
स्वप्निल शेवडेचा शोध सुरू
मेरी वेदर मैदान दि. २० ते ३० जानेवारी दरम्यान स्वप्निल शेवडे या व्यक्तीच्या नावे क्रिकेट सामने घेण्यासाठी १० हजार रुपये जमा करून नोंदित केले आहे. पण शेवडे याचा पत्ता अगर काही ठावठिकाणा इस्टेट विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समजते. या शेवडेचा शोध महाडिक समर्थक घेत होते; पण त्यांनाही शेवडेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
मेरी वेदर मैदानावरच कृषी प्रदर्शन
गेल्या आठ दहा वर्षांपासून मेरी वेदर मैदानावरच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारने भीमा कृषी प्रदर्शन भरवले जात आहे. यंदाही या मैदानावरच प्रदर्शन घेण्यासाठी महाडिक गटाकडून आता प्रतिष्ठेचा विषय केला जात आहे. याच मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यासाठी महसूल विभागाच्या सचिवांपर्यंत यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यासाठी काही मंत्र्यांनीही हस्तक्षेप करून त्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.