आयुर्वेद ग्रंथदिंडीतून निरोगी राहण्याचा संदेश
By Admin | Published: October 28, 2016 11:52 PM2016-10-28T23:52:36+5:302016-10-28T23:52:36+5:30
धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा
कोल्हापूर : ‘आयुर्वेद हा आरोग्याकडे जाण्याचा मार्ग’,‘आयुर्वेदाची जाण, राखील स्वास्थ्याचा मान’, ‘कुणी करे शमन, कुणी पंचकर्म, निरोगी जीवनाचे हेच खरे मर्म’ असे जनजागृतीचे फलक अशा वातावरणात शुक्रवारी आयुर्वेद ग्रंथदिंडी काढण्यात आली.
धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ग्रंथदिंडीची सुरुवात शिवाजी चौकातून सायंकाळी वैद्य वामनाचार्य यांच्या हस्ते धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आयुर्वेद गं्रथदिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडपात आली. तेथून अंबाबाई मंदिरातील श्री धन्वंतरी मंदिरात येऊन तिची सांगता झाली. या ठिकाणी वैद्य रसिका देशपांडे यांनी धन्वंतरीचे पूजन करून स्तवन केले. यावेळी ‘आयुर्वेदाचे उपयोग’ याविषयीची माहितीपत्रके वाटली.या दिंडीत ‘निमा’ कोल्हापूरच्या डॉ. माधुरी कुलकर्णी, ‘निमा’ करवीरचे डॉ. मुळीक, आयुर्वेद व्यासपीठचे डॉ. शीतल देशपांडे, ‘मर्म’चे अध्यक्ष डॉ. अजित राजिगरे, कांकायन आयुर्वेदिक महाचिकित्सालयाचे डॉ. दिलखुश तांबोळी, आयुर्वेदिक अभ्यासवर्गचे शीतल देशपांडे, लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालयाचे डॉ. हरीश नांगरे, आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशनचे डॉ. दीनानाथ माणगावे, जिल्हा केमिस्टस अॅँड ड्रगिस्टस असोसिएशनचे डॉ. शशिभाई कुलकर्णी, श्रीकृष्ण मांडे आदींंचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त कोल्हापुरातील आयुर्वेद डॉक्टरांनी शुक्रवारी शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढली. या दिंडीमध्ये डॉक्टर सहभागी झाले होते.