बारशातूनही दिला जातोय ‘लेक वाचवा’चा संदेश
By admin | Published: February 3, 2015 10:43 PM2015-02-03T22:43:40+5:302015-02-04T00:02:37+5:30
चिपळुणात आगळावेगळा पॅटर्न : अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा पुढाकार
चिपळूण : मुलगा काय, मुलगी काय दोघे समान आहेत. आजची बालिका उद्याची माता, दुर्लक्ष करु नका तिच्याकडे आता... असे सांगत ‘लेक वाचवा’ हे अभियान आता मुलीच्या बारशातूनही प्रभावीपणे मांडले जात आहे. अंगणवाडी सुपरवायझर, सेविका व मदतनीस यांचा यामध्ये पुढाकार आहे. ‘लेक वाचवा’ हे अभियान सध्या प्रभावीपणे राबवले जात आहे. मुलगा-मुलगी भेद करु नका, हे सांगतानाच शासनाने महिलांसाठी दिलेले आरक्षण व इतर सुविधांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे उदाहरणासह पटवून दिले जाते. अंगणवाडी सुपरवायझर योजना अनिल गांधी व त्यांच्या सहकारी सेविका ग्रामीण भागात यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यवेक्षक गांधी यांनी शिरळ मोरेवाडी, ओमळी, खरवते ग्रामपंचायतीतही किशोरी मेळावे घेऊन हळदीकुंकवाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले होते. सरपंच हरिश्चंद्र घाग, सरपंच सायली कदम तर मिरजोळी येथे सरपंच वर्षा चव्हाण, माजी सरपंच इब्राहिम दलवाई, तंटामुक्ती अध्यक्ष सयाजी पवार, खालीद दलवाई, कमलाकर आंब्रे, ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. गांधी यांना अस्मिता बुटाला, कल्पना वाघे, सुमन सावंत, प्रभा साळवी, मंदा मोहिते, अस्मिता सावंत, एस. डी. पवार, मुख्याध्यापिका प्रियांका सावर्डेकर, गौरी शेट्ये आदींनी सहकार्य केले. आरोग्य विभागातर्फे बालक-पालक किशोरी महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी, लेक वाचवण्याचा संदेश देण्यात आला. वैष्णवी पवार हिने मैत्रिणीच्या सहाय्याने विविध आकर्षक रांगोळ्या रेखाटून जन्मा येता बालराजा, आईचे दूध त्वरित पाजा, गरोदर मातांनो टिएचआर घ्या, सुदृढ बालकास जन्म द्या, मुलगी-मुलगा करु नका भेद, मुलींच्या जन्माला करु नका छेद, सुदृढ शिशु गावासाठी हसू असा संदेश दिला. मेघना लिंगायत, उज्ज्वला जाधव, सीमा सुर्वे, मंगल भोसले आदींनी विविध पदार्थ, शरीरास आवश्यक असणाऱ्या अन्नघटकाच्या माहितीचे प्रदर्शन मांडले. पर्यवेक्षिका गांधी यांनी कुपोषणमुक्ती अभियानातून किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा मातांनी घ्यायची काळजी तसेच ६ महिन्यानंतर बाळाचा वरचा आहार, कमी वजनाच्या बालकांचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. (प्रतिनिधी)