भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप
By admin | Published: September 17, 2016 12:52 AM2016-09-17T00:52:59+5:302016-09-17T00:58:09+5:30
जयसिंगपूर, शिरोळ परिसर : डॉल्बीला फाटा देऊन ढोल-ताशा, झांज, लेझीम, बेंजोचा सहभाग
जयसिंगपूर : ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड परिसरांत २७३ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन डॉल्बीला फाटा देऊन ढोल-ताशा, झांज, लेझीम, बेंजोच्या दणदणाटात करण्यात आले. काही मंडळांनी मूर्तिदान करून नदी प्रदूषण टाळले आहे. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या तिन्ही पोलिस ठाण्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जयसिंगपूर पोलिस ठाण्याअंतर्गत आठ गावांतील ४८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये जयसिंगपूर परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन उदगाव येथील कृष्णा नदीपात्रात करण्यात आले, तर १३ मंडळांनी मूर्तिदान केल्या. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलिस कर्मचारी व १३ होमगार्ड यांच्या साहाय्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये दानोळी, उदगाव, निमशिरगाव, चिपरी, आदी गावांत बंदोबस्त ठेवला होता.
शिरोळ पोलिस ठाण्याअंतर्गत ४३ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पंचगंगा, कृष्णा नदीत करण्यात आले. यामध्ये काही मंडळांनी मूर्तिदान केल्या आहेत. तसेच अर्जुनवाड घाट, शिरोळ, नांदणीसह परिसरात मोठ्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शिरोळ पोलिसांकडून डॉल्बीला वापरणारे मिक्सर जप्त करण्यात आले. शिरोळ येथे सहायक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्या साहाय्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याअंतर्गत अनंत चतुर्दशीदिवशी १८२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये नृसिंहवाडी, कुरुंदवाड, हेरवाड, दत्तवाड, टाकळी, अब्दुललाट परिसरातील गावांत मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींचे विसर्जन करण्यात आले.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याकडे ४१९ मंडळांची नोंद झाली होती. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.