मीटर नसणारे नळ कनेक्शन होणार बंद
By admin | Published: March 9, 2017 11:52 PM2017-03-09T23:52:54+5:302017-03-09T23:52:54+5:30
जयसिंगपूर पालिकेची मोहीम : नळधारकांची मानसिकता बदलण्याची गरज; जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर
संदीप बावचे --जयसिंगपूर शहरात ७९०० ग्राहकांपैकी यातील ९२ टक्के नळधारकांनी आतापर्यंत नळांना मीटर बसविली आहेत. साडेचार वर्षांपूर्वी जयसिंगपूर पालिकेने शहरात नळांना मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली होती. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर, अशा या योजनेत शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही आठ टक्के नळधारकांनी नळाला मीटर न बसविल्यामुळे येत्या एप्रिलपासून असे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम पालिका राबविणार आहे.
पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी. शिवाय शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने नगरपालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा मीटर पद्धतीने करण्याची अंमलबजावणी १ जूलै २०१२ पासून सुरू झाली होती. सन २०१२-१३ मध्ये ६० टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने ही मोहीम राबविण्यात आली.
शहराचा वाढता विस्तार व पाण्याची मुबलकता वाढू लागल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली़ शहरवासीयांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरेशा समान दाबाने देण्याकरिता शहरात नळांना मीटर बसविण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. नळांना मीटर बसविण्याबाबत शहरवासियांत जनजागृती मोहीम राबवून ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथेही टप्प्याटप्प्यांने मीटर बसविण्यात आले. शहरात ७९०० नळ कनेक्शनधारक असून, यापैकी ९२ टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविलेली आहेत. मात्र, उर्वरित नळ कनेक्शनधारकांनी नळाला मीटर बसविले नाहीत. तसेच जे नळधारक नळांना मोटर लावतात, अशा नळधारकांचे येत्या एप्रिलपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा प्रशासनाने दिली. त्यामुळे ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले
आहे़
मोहीम तीव्र करणार
पाणी करासाठी ‘कनेक्शन बंद’ची मोहीम पालिका राबवित आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टी, थकबाकी वसुली अंतर्गत वर्षानुवर्षे जे नळ कनेक्शनधारक पाणीकर भरत नाहीत, अशा सुमारे तीनशेहून अधिक नळधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने केली आहे.
कर न भरणाऱ्यांना नोटिसा बजावून ही मोहीम राबविण्यात आली असून, १५ मार्चनंतर ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी प्रयत्न.
शहरात आतापर्यंत ९२ टक्के नळधारकांनी नळाला मीटर बसविले आहेत.
जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी
कर याबाबत टप्पे ठेवण्यात आले आहेत.
शहराचा पाणीपुरवठा हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून नळ
पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धीकरणाचे नूतनीकरण याचबरोबर नवीन पाण्याची टाकी, असे पालिकेचे धोरण आहे.