शिवाजी विद्यापीठाची ‘ग्रेस गुण’ नोंदविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:38 AM2019-05-06T00:38:03+5:302019-05-06T00:38:12+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विविध विषयांच्या विद्यार्थ्यांना उच्च द्वितीय श्रेणी (हायर सेकंड क्लास) ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विविध विषयांच्या विद्यार्थ्यांना उच्च द्वितीय श्रेणी (हायर सेकंड क्लास) आणि द्वितीय श्रेणी (सेकंड क्लास) देण्यासाठी ‘डॉलर ०.९१’ अंतर्गत ग्रेस गुण दिले जातात. मात्र, गुणपत्रिकेवर हे ग्रेस गुण नोंदविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना मारक ठरत आहे. असे गुण मिळालेले विद्यार्थी प्राध्यापक पदासाठीची राज्य आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा (सेट-नेट) आणि एम. फिल., पीएच.डी. प्रवेशासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमानुसार अपात्र ठरत आहेत. या गुण देण्याच्या पद्धतीचा विद्यार्थ्यांना बसणारा फटका, ही पद्धत बदलण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्रयत्न, आदींचा वेध घेणारी मालिका आजपासून...
एखादा विद्यार्थी सर्व
विषयांमध्ये उत्तीर्ण आहे. मात्र, त्याला हायर सेकंड क्लास, सेकंड क्लासमध्ये जाण्यासाठी आवश्यक असणारे कमीत कमी एक ते जास्तीत जास्त दहा गुण या ‘डॉलर ०.९१’ अंतर्गत ग्रेस गुण म्हणून दिले जातात. या गुणांची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर त्याची नोंद केली जाते. गेल्यावर्षी युजीसीने एम. फिल., पीएच.डी. प्रवेशासाठी असे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा नियम केला आहे. त्याबाबतच्या सूचना देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
श्रेणीमध्ये वाढ झाल्याने संबंधित विद्यार्थी हा सेट अथवा नेट परीक्षा देतो. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र पदव्युत्तर पदवीसाठी ग्रेस गुण मिळाले असल्याने त्याला सेट अथवा नेटमध्ये पात्र ठरल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. एम. फिल., पीएच.डी.ला प्रवेशदेखील मिळत नाही. त्यामुळे या गुणांची सवलत मिळालेल्या विद्यार्थी अथवा सेवेत असलेल्या सहायक प्राध्यापकांचे पुढील शिक्षण, करिअर थांबत आहे. मात्र, विद्यापीठ, सेट-नेट परीक्षा घेणारा विभाग आणि युजीसी आपआपल्या नियमांवर ठाम असल्याने या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने याबाबत मार्ग काढण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
विद्यापीठ कॅम्पसमधील आकडेवारी दृष्टिक्षेपात
पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी : १५३५
पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी : ३६५३
एम. फिल. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी : १९२
पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी असलेले विद्यार्थी : ६८९
गुणपत्रिकेवर नोंद पद्धतीचा फटका
विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून श्रेणी वाढविण्यासाठी विद्यापीठाकडून ग्रेस गुण
देण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, हे गुण दिल्यानंतर त्याची गुणपत्रिकेवर नोंद करण्याच्या पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीने
गुण दिले जातात. मात्र, गुणपत्रिकेवर ग्रेस गुण दिल्याचा स्पष्ट उल्लेख या विद्यापीठांकडून केला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एम. फिल, पीएच.डी. अथवा सेट-नेट करण्यात अडचण येत नाही.