४१४ जणांना म्हाडाची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:09+5:302021-08-29T04:24:09+5:30
कोल्हापूर : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) कागल येथे बांधण्यात आलेल्या ४३२ घरांची ऑनलाईन सोडत आज, शनिवारी येथील ...
कोल्हापूर : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) कागल येथे बांधण्यात आलेल्या ४३२ घरांची ऑनलाईन सोडत आज, शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात काढण्यात आली. विविध गटांतून आलेल्या ८४१ अर्जदारांपैकी ४१४ जणांना पाच लाखांत घर मिळाले. कागदपत्राची छाननीनंतर पैसे म्हाडाकडे भरल्यानंतर घराचा ताबा मिळणार आहे.
माजी सैनिक, पत्रकार, केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, कलाकार, माजी सैनिक, दिव्यांग, मागासवर्गीय, अनुसूचित जाती आदी गटांतून ८४१ अर्ज म्हाडाकडे घरासाठी आले होते. खासदार, आमदार, विधान परिषदेच्या आमदारांसाठी ९ आणि म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ९ राखीव घरांसाठी एकही अर्ज आला नाही. यामुळे ४३२ पैकी ४१४ जणांना सोडतीद्वारे घरे मिळाली.
दरम्यान, सकाळी ११ वाजता घरांसाठी ऑनलाईन सोडतीला निवृत्त न्यायाधीश तथा सोडत समितीचे अध्यक्ष एम. एम. पोतदार यांच्याहस्ते प्रारंभ झाला. संगणक स्वॉफ्टवेअरद्वारे सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये घर मिळालेल्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता.
सोडतीप्रसंगी बोलताना पुणे विभाग म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने म्हणाले, म्हाडातर्फे कागल येथे बांधण्यात आलेल्या ४३२ घरांसाठी ऑनलाईन सोडत पारदर्शकपणे काढण्यात आली. घर वितरणात कोणत्याही एंजटगिरीला स्थान नाही. सोडतीतून घरासाठी ज्यांचे नाव आले आहे, त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल. छाननीत पात्र ठरलेल्यांना घराची किंमत भरल्यानंतर प्रत्यक्ष ताबा मिळणार आहे
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैया माने यांचे भाषण झाले. सोडतीमध्ये घरासाठी नाव आलेल्या वैभव कुंभार, विक्रम कुंभार यांचा प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरा्ध्य प्रकाश गाडेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, एनआयसीचे अधिकारी प्रताप पाटील, म्हाडाचे अधिकारी विजय ठाकूर आदी उपस्थित होते.
चौकट
दोन्ही मंत्री गैरहजर
कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थितीमध्ये नावे होती, पण हे दोन्ही मंत्री कार्यक्रमास गैरहजर राहिले. कार्यक्रमादरम्यान मंत्री मुश्रीफ शासकीय विश्रामगृहात आले होते, पण ते कार्यक्रमास हजर राहिले नाहीत.
चौकट
पाच लाखांत घर
अधिकारी माने म्हणाले, म्हाडाच्या घराची किंमत प्रत्येकी ९ लाख ३८ हजार आहे, पण ४३२ घरांच्या प्रकल्पात काही दुकानगाळे काढल्याने घरांची किंमत कमी होऊन ७ लाख ५० हजार झाली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या अडीच लाखांचे अनुदान मिळाल्यास ४१४ जणांना प्रत्येेकी ५ लाख रुपयास घर मिळेल.
फोटो ओळी : २८०८२०२१-कोल- म्हाडा कार्यक्रम
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातील म्हाडाच्या घराच्या ऑनलाईन सोडतीत घर मिळालेले लाभार्थी वैभव कुंभार यांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे संचालक भैया माने यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला.