कागलमध्ये ‘म्हाडा’ची घरेही स्वस्तातच देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:19+5:302021-04-05T04:22:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कागल : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी कागल शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी असा घरकुल प्रकल्प ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी कागल शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी असा घरकुल प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील घरांचे वाटप करताना मनाला समाधान वाटत आहे. चौथा टप्पाही लवकर पूर्ण करू आणि म्हाडा योजनेतूनही सामान्य माणसांना स्वस्तात सदनिका उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल नगर परिषदेकडून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील २५२ सदनिकांचे वाटपासाठी पात्र लाभार्थींच्या चिठ्ठ्या काढण्याचा कार्यक्रम रविवारी येथील मराठा भवन येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक माळी होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, भय्या माने, चंद्रकांत गवळी, रमेश माळी, मुख्याधिकारी पंडित पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी आणि नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते यांना डी. आर. माने महाविद्यालयात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवले होते. व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे सर्वांना हा कार्यक्रम दाखविण्यात आला.
यावेळी स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक करताना भय्या माने म्हणाले की, घरकुलांचे वाटप करून मंत्री मुश्रीफ यांनी गोरगरिबांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. अशी योजना राबविणारी कागल नगरपालिका राज्यात एकमेव आहे. पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी आभार मानले.
गुढीपाडव्याला वास्तूशांती आणि पुरणपोळी...
मुश्रीफ म्हणाले की येत्या १३ तारखेला गुढीपाडव्याला या नवीन घरांची वास्तूशांती करा. कोरोनामुळे एकत्र जेवण करता येणार नाही. जिलेबीचे वाटप प्रवीण काळबर करतील. आपण स्वतः एका घरात पुरणपोळीचे जेवण खाणार आहोत. यावेळी चिठ्ठीनिहाय सदनिका वाटप झाले. त्यांची नावे स्वतः मंत्री मुश्रीफ यांनी पुकारली. दरम्यान, नावांच्या चिठ्ठ्या निघत असताना अनेक लाभार्थींची घालामेल सुरू होती.
फोटो कॅप्शन
कागल येथे घरकुल योजनेतील मंजूर सदनिकांचे वाटप चिठ्ठीद्वारे करण्यात आले. लहान मुलांच्या हस्ते या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्ष माणिक रमेश माळी, भय्या माने, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर उपस्थित होते.