‘म्हाडा’चे प्रकल्प कोल्हापुरात राबविणार
By admin | Published: April 18, 2017 01:21 AM2017-04-18T01:21:55+5:302017-04-18T01:21:55+5:30
समरजितसिंह घाटगे : ग्रामीण जनतेसाठीही घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : ‘म्हाडा’च्यावतीने केवळ एकच प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे; मात्र योग्य जागांचा शोध घेऊन गरजूंना हक्काचे घर देण्यासाठी अधिकाधिक गृह प्रकल्प कोल्हापुरात राबविणार असल्याची माहिती पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच घाटगे यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गेली तीन वर्षे ‘म्हाडा’चे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे ‘म्हाडा’च्या जागा विभागात नेमक्या कोठे व कोणत्या अवस्थेत आहेत, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या म्हाळुंगे (पुणे) येथे २८०० फ्लॅटचा मोठा प्रकल्प सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘म्हाडा’ही पुढे असेल. ‘म्हाडा’च्या माध्यमातून आगामी काळात ग्रामीण भागातील जनतेसाठीही घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या ही खरी अडचण असून, बाहेरून कर्मचारी घेता येतील का? याची चाचपणीही सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन प्रकल्पाबरोबरच प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन घाटगे यांचे स्वागत केले.
दर्जेदारपणास प्राधान्य!
‘म्हाडा’च्या बांधकामाविषयी काही तक्रारी आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आगामी काळात त्या येणार नाहीत. बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे घाटगे यांनी सांगितले.